आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नियोजन सुरू
गोंदिया : हवामान विभागाने यंदा भरपूर पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. मान्सून कालावधीत जिल्ह्यातील ९६ पूरप्रवण गावांना पुराचा धोका आहे. मागीलवर्षी आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये. धरण व जलाशय इत्यादी ठिकाणी यावर्षी पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे सर्व संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात सरासरी १३२७.४९ मि.मी. पाऊस पडतो. जिल्ह्याच्या बाजूला मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या सीमा लागून आहेत. बालाघाट आणि राजनांदगाव जिल्ह्यात पडणारा पाऊस संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रवेश करतो. तसेच संजय सरोवर (मध्य प्रदेश) येथून सुटणारे विसर्गाचे पाणी २५ तासात वैनगंगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचते. तसेच शिरपूर (देवरी) येथून सुटणारे विसर्गाचे पाणी २७ तासात बाघनदीच्या माध्यमातून रजेगाव घाटापर्यंत पोहोचते. त्यामुळे याचा जिल्ह्यातील पूरबाधित गावांना अधिक फटका बसू नये यादृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. याच अनुषंगाने प्रात्यक्षिक सुध्दा करण्यात आले.
..........
पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आठही तालुक्यांतील एकूण ९६ गावांना याचा फटका बसतो. यात प्रामुख्याने कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, ढिवरटोला, कंटगटोला, वडेगाव, छोटा गेोंदिया, वडेगावबंध्या, बोरी, सावरी, बोरगाव, वडेगाव, मोहनटोला, मकरधोकडा, शिलापूर, सावली, घाटबोरी, कोदामेझी, भाडीपार, घोगरा, चांदोरी खुर्द, किडंगीपार, ढिवरटोला या गावांना सर्वाधिक पुराचा फटका बसतो. त्यामुळे गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करायच्या, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.
..............
शहरातील धोकादायक इमारती, धोकादायक झाडे
- नगरपरिषदेने गोंदिया शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच किती इमारती जीर्ण झाल्या आहेत, याअनुषंगाने सर्वेक्षण केले. त्यात १२३ इमारती धोकादायक असल्याचे आढळले.
- जीर्ण इमारती पाडण्यासाठी संबंधित घरमालकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच महिनाभरात जीर्ण इमारत न पाडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
- गोंदिया शहरातील विविध मार्गांवर व विद्युत खांबालगत ३५४ वृक्ष असून पावसाळ्यात यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी त्यांची छाटनी नगरपरिषद व विद्युत वितरण विभागाने सुरू केली आहे.
........
कोट
मागीलवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे धरण आणि तलावांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच यंदा हवामान विभागाने भरपूर पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आहे. यादृष्टीने आढावा घेऊन व प्रात्यक्षिक सुध्दा करण्यात आले आहे.
- राजेश खवले, जिल्हाधिकारी
...................
अग्निशमन दल सज्ज
- मान्सूनपूर्व नियोजन व जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे वेळीच नियोजन करण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज आहे.
- आपत्कालीन काळात वेळीच मदतकार्य पोहोचविण्यासाठी अग्नीशमन विभागाच्या ४५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- वेळीच मदत करण्यासाठी यंत्रसामग्री, अग्निशमन वाहनांची अडचण होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
- वृक्ष कटाईसाठी कटर, तसेच इतर यंत्रसामग्री व मनुष्यबळ सुध्दा सज्ज ठेवण्यात आले आहे.
................
जिल्ह्यातील नद्या : ८
नद्यांशेजारील गावे : ९६
पूरबाधित होणारे तालुके : ८
.......................
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान : १३२७.४९ मि.मी.
...............
प्रशासनाची काय तयारी...
फायर फायटर : ४५
रेस्क्यू व्हॅन : ०२
फायबर बोटी : ६
लाईफ जॅकेट्स : ९०
कटर : १०