लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुमारे ८ महिन्यांनंतर अखेर मंदिरे उघडण्याची परवानगी आल्यानंतर सोमवारी (दि.१६) अवघ्या राज्यासह येथील मंदिरांची दारे उघडली व भाविकांनी मंदिरात जाऊन देव दर्शन घेतले. विशेष म्हणजे, काही मंदिरांत बॅंडबाजा वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर काही मंदिरांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व करीत असताना मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आल्याचेही दिसले. कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून अवघ्या देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊन अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मंदिरांतही भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मंदिराचे पुजारी किंवा संबंधित व्यक्तीलाच मंदिरात देवांची पूजा-अर्जा करण्याची परवानगी होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन देव दर्शनापासूनही वंचित व्हावे लागले होते. मंदिरांवर लावण्यात आलेल्या या बंदीमुळे पुजारी तसेच हार-फुल व प्रसाद विक्रेतेही अडचणीत आले होते. यामुळे राजकीय पक्ष व संघटनांकडून मंदिर उघडण्याची मागणी केली जात होती. मात्र राज्य शासनाकडून परवानगी दिली जात नव्हती. मंदिर उघडण्यात यावे या मागणीसाठी राजकीय व काही संघटनांकडून आंदोलनही करण्यात आले. मात्र राज्य शासनाने मंदिर उघडण्याला घेऊन निर्णय घेतला नव्हता. मात्र अखेर राज्य शासनाला मंदिर उघडण्याबाबत निर्णय घ्यावा लागला व यासाठी सोमवारचा (दि.१६) मुर्हूत ठरला. त्यानुसार, सोमवारी सर्वच मंदिरांची दारे उघडण्यात आली. विशेष म्हणजे, सुमारे ८ महिन्यांनंतर हा शुभ दिवस उजाडल्याने शहरातील दुर्गा मंदिर व सिव्हील लाईन्स परिसरातील हनु्मान मंदिरात बॅंडबाजा वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचेही दिसले. विशेष म्हणजे, शहरातील अन्य सर्वच मंदिरांमध्येही देवाचे पूजन करून मंदिर उघडण्यात आले.
मंदिरांसाठी काय आहेत अटी-शर्ती संबंधित ट्रस्ट-समितीने ठरविलेल्या वेळेनुसार मंदिर खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मंदिरात मास्क घालून रहावे लागणार आहे. सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. भाविकांसाठी थर्मल तपासणीची व्यवस्था, हात धुण्याची व सॅनिटायजरची व्यवस्था करणे ट्रस्ट व समित्यांना बंधनकारक राहणार आहे.
पहिल्या पूजेचा मान पुजारींनाच ८ महिन्यांच्या दिर्घावधीनंतर अखेर सोमवारी मंदिरे उघडण्यात आली. अशात येथील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिरातील पुजेचा मान मंदिरातील पुजाऱ्यांना देण्यात आला. त्यांनी सकाळी ६ वाजता हनुमंताला अभिषेक घातला व ७ वाजता भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.