नवेगावबांध (गोंदिया) : नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन येथील बैलगाडा शर्यत समितीच्यावतीने १६ व १७ एप्रिल रोजी केले आहे. यामध्ये १०० हून अधिक बैलगाडा भाग घेणार असल्याचे कळले आहे.
बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी सोयी सुविधा केल्या जात असून येथील काही हौशी बैलगाडा शर्यतीत भाग घेणारे बैलगाडा मालक व पशुपालकांनी मागील १५ दिवसांपासून रंगीत तालीम सुरू केली आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी या ठिकाणी बैलांना तालीम दिली जात आहे. तर लांब पल्ल्याच्या जोड्या व शर्यतीमध्ये अग्रभागी क्रमांक मिळविणाऱ्या जोड्या वेळेवर दाखल होणार असल्याचे कळले आहे.
येथे दरवर्षी संक्रांतमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत येथे भरविली जात होती. मात्र येथे जागा संपल्याने ती संपुष्टात आली होती. नंतर पुन्हा या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. परंतु उच्च न्यायालयाच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीनुसार हे सर्व बंद झाले होते. पुन्हा एकदा यावरील बंदी उठविल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असल्याने येथील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बैलगाड्या शर्यतीसाठी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे बैलगाडा शर्यत कमिटीकडून कळविण्यात आलेले आहे. याच दिवशी सायंकाळी ‘वंदेमातरम’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
विशेष म्हणजे, या बैलगाडा शर्यतीसाठी अमरावती, मूर्तीजापूर, मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट, छत्तीसगड राज्यातील छुरीया येथील बैलजोड्या आल्या आहेत.