गोंदिया : माझ्या मुलाचा अपघात नसून त्याला मारण्यात आले, असा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीला घेऊन वडिलांनी मोबाईल टॉवरवर चढून विरुगिरी केली. गुरुवारी (दि. १४) पहाटे ४ वाजता तालुक्यातील ग्राम खातिया येथे टॉवरवर चढलेले वासुदेव रामू तावाडे (रा. खातिया) मागणी मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी ५ वाजता उतरले.
वासुदेव तावाडे हे गुरुवारी सकाळीच कुटुंबीयांना काहीही न सांगता बाहेर निघून गेले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती बसला असल्याचे गावकऱ्यांना दिसले. याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी टॉवरजवळ गर्दी केली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. यानंतर काही वेळातच रावणवाडीचे ठाणेदार उद्धव डमाळे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. वासुदेव तावाडे यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवर फोन लावून त्यांचे कुटुंबीय आणि पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधून टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली.
मात्र, ते कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते टॉवरवरच बसून होते. पोलीस उपअधीक्षक सुनील ताजने यांनी घटनास्थळी पोहोचत वासुदेव यांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र ते कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. वासुदेव तावाडे यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मात्र, माझ्या मुलाचा अपघात नसून त्याला मारण्यात आल्याचा आरोप तावाडे यांनी केला. पोलीस विभागाने या प्रकरणाची योग्य चौकशी केली नसल्याचा आरोप होता. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांची अधिकृत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने लिखित दिल्यानंतर ते शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी ५ वाजता खाली उतरले.