तिरोडा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही सिंचन विहिरीचे अनुदान दिले नाही. शिवाय वीज जोडणी ही देण्यात आलेली नाही. संबंधित विभाग आणि शासनाला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेण्यात आली नाही. ही समस्या त्वरित मार्गी न लावल्यास ३० ऑगस्ट रोजी प्रहारचे कार्यकर्ते विहिरीत बसून आंदोलन करतील असा इशारा पोलीस अधीक्षक व संबंधित विभागाला दिलेल्या निवेदनातून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.
तिरोडा तालुक्यातील मांडवी येथील लाभार्थी शेतकरी यांच्या शेतात धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. तसेच सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील लाभार्थी पुरूषोत्तम वाहेकार व भाडीपार येथील अनंतराम गेडाम यांच्या शेतात योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही. ज्या विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्या विहिरींपर्यंत वीज जोडण्यात आली नाही. योजनेची रक्कम व वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. ३० ऑगस्ट पूर्वी या मागण्या मार्गी न लावल्यास प्रहारचे कार्यकर्ते शेतातील विहिरीत बसून ३० ऑगस्ट रोजी आंदोलन करतील असा इशारा महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.