६ महिन्यांत ४ लाखांचा नफा : नोकरीची आशा सोडून शेती व्यवसायाला प्राधान्यकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या अर्जुनीजवळील बोंडराणी येथील नदीकाठी एका शिक्षित युवकाने शेतीकडे मन वळवून भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरूवात केली आहे. नोकरीची आशा न करता शेतीतून चांगले जीवन जगता येते, असा संदेश त्याने आपल्या पहिल्याच वर्षाच्या अनुभवातून दिला आहे.तिरोडा येथील प्रगतीनगरात राहणारा नितीन देवदास पारधी असे त्या युवकाचे नाव आहे. त्याने डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मध्ये नोकरी केली. यानंतर गुजरातला स्थानांतर करण्यात आले. त्यामुळे नितीनचे मन वळले व त्याने शेती करण्याचा निर्धार केला. अर्जुनी (परसवाडा) क्षेत्रात बोंडराणी येथे नदीकाठी असलेल्या पाच एकर शेतीपैकी दीड एकरात उन्हाळी धानपीक लावले. तीन एकर शेतात टमाटर, वांगी व मिरचीचे पीक लावले. तसेच अर्ध्या एकरमध्ये हरभरा व गव्हाचे पीक लावले. अशा पद्धतीने पहिल्या वर्षी आपले मन शेतीत लावून अनुभव घेतला व यात यशस्वीसुद्धा झाला.नितीनने सिव्हील इंजिनियरचा डिप्लोमा घेतला असून आपल्याला नोकरीची आशा असली तरी एकाच बाबीवर अवलंबून न राहता, भविष्यात नोकरी लागली नाही तर आपल्याला शेतीवर जीवनयापन करता यावे, यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे तो सांगतो. आतापर्यंत ड्रीप (पाईप लाईन) व बियाणे, खत, मजुरी मिळून दोन लाख पन्नास हजार रूपये खर्च आलेला आहे. आतापर्यंत एक लाख रूपयांचे टमाटर, ३० हजारांची वांगी व धानातून ५० हजार रूपयांचे उत्पादन हाती मिळाले असल्याचे नितीनने सांगितले आहे. भाजीपाल्याची लागवड उशिरा केल्याने वांग्यांचे उत्पादन जुलै शेवटपर्यंत मिळणार आहे. दोन एकरमध्ये वांग्याचे पीक असल्याने शेवटपर्यंत पाच ते सहा लाख रूपयांचे उत्पादन मिळणार असल्याचे नितीनने लोकमतशी बोलताना सांगितले. त्याचे हे पहिले वर्ष असून यावर्षी त्याचे वडील कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांच्या मार्गदर्शनात त्याने पिकांची लागवड केली. सद्यस्थितीत आठवड्यात २० कॅरेटच्या वर टमाटर, २० ते ३० पोती वांगी तोडल्या जाते. नोकरीपेक्षा शेतीकामात खूप आनंद वाटतो, असेही तो सांगतो. निसर्गाने साथ दिल्यास व भाजीपाल्याचे भाव स्थिर राहिल्यास आपल्याला सहा महिन्यांत तीन ते चार रूपयांचा शुद्ध नफा होणार असल्याचेही तो बोलला.वडील देविदास पारधी यांनी नोकरीवर आशा न ठेवता शेतीकडे लक्ष द्या. अनुभव निरर्थक ठरत नाही. ते कधीही कामी येतात, असे मार्गदर्शन केल्याने आपण शेतकडे वळल्याचे त्याने सांगितले. सध्या आपल्याला कोणतेही त्रास किंवा चिंता नसून आनंदित असल्याचे म्हटले. भविष्यात चांगली नोकरी लागली तर करू, असे ही तो म्हणाला. शिक्षित पदवीधार मुलांनी नोकरीवरच अवलंबून न राहता इतर क्षेत्र व व्यवसायाचे गुण अंगिकारणे गरजेचे आहे. जेवढे सुख व आनंद शेती करण्यात मिळतो, तेवढे सुख व आनंद इतर कोत्याही क्षेत्रात मिळत नाही. आपण स्व:ताच्या या व्यवसायामुळे सतत पाच १० मजुरांना नियमित कामे देवू शकता. यातून खूप आनंद मिळते, असे नितीने सांगितले. (वार्ताहर)
अभियंता करतो भाजीपाल्याची शेती
By admin | Published: May 24, 2016 1:58 AM