गोंदिया : प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी जवळील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर जावे लागते. यासाठी आपले धान केंद्रावर न्यावयासाठी त्यांना ५ ते १० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. केंद्रावर नंबर येईपर्यंत त्यांना वाट बघावी लागते. नंबर लागला नाही तर धान घेऊन परत घरी यावे लागते; मात्र प्रत्येक गावात कृषी गोदाम असल्यास शेतकऱ्यांची पायपीट थांबेल, त्यांचे पीक गावातल्या गावात खरेदी होऊन मोठ्या आर्थिक भुर्दंडापासूनदेखील त्यांची सुटका होईल. यामुळे प्रत्येक गावात कृषी गोदाम उभारणार, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम तांडा येथे २० लक्ष रुपयांच्या निधीतून मंजूर कृषी गोदामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी चाबी संघटनेचे अध्यक्ष भाऊराव उके, ग्रामीण अध्यक्ष छत्रपाल तुरकर, ज्येष्ठ नेते धनंजय तुरकर, महामंत्री सुजित येवले, माजी पं.स. सदस्य रामराज खरे, छगन माने, परसराम हुमे, योगेंद्र हरिणखेडे, विक्की बघेले, मुनेश रहांगडाले, चेतसिंह परिहार, एन.डी.अतकरे, प्रमोद रहांगडाले, मुलचंद बिसेन, पुष्पा कटरे, इंद्रायणी रहांगडाले, हसनसिंह सोमवंशी, नारायण भगत, रेखा बोरकर, कैलाशसिंह चावडे, गेंदलाल रहांगडाले यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.