काळ्या फिती लावून कामकाज : तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने करण्यात यावा, या मागणीसाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) आंदोलनाचा पवित्रा उगारला असून काळ्या फित लावून कामकाज केले. तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग नुकताच स्थापन केला आहे. परंतु कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल याबाबत कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकाची सर्वच पदे स्वत:कडे घेतली आहेत. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकांना पदोन्नतीला पद राहणार नाही. कृषी विभागामध्ये बरीच पदे आजघडीला रिक्त आहेत. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा. कृषी सहायकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करावे. कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात यावे, सदर प्रस्तावास सामान्य प्रशासन विभाग, विधी न्याय विभाग यांनी यापूर्वीच मान्यता दिली आहे. परीक्षेची अट रद्द करावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत सर्वच कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून कामकाज केले. आपल्या मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी ढाकले यांच्याकडे दिले. आंदोलनात अविनाश हुकरे, भारती येरणे, पी.एम. सूर्यवंशी, व्ही.पी. कवासे, डी.एम. शहारे, एफ.एम. कापगते, पी.बी. काळे, आर.एच. मेश्राम, सी.आर. मसराम, पी.के. खोटेले, एम.टी. येळणे, बी.एम. नखाते, एन.एन. बोरकर, वाय.बी. मोहतुरे, जी.एस. पुस्तोडे, एस.एफ. ठवकर, व्ही.आर. औरासे, पी.बी. वासनिक, एस.एन. बोचरे आदींचा सहभाग होता. ऐन शेती हंगामात कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शेतकरी बांधव कृषी मार्गदर्शनास मुकण्याची परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. विविध टप्प्यात आंदोलन आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे विविध टप्पे अंगिकारले आहे. १२ ते १४ जूनपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज करणे, १५ ते १७ जून या कालावधीत लेखणी बंद आंदोलन, १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर निदर्शने व धरणे आंदोलन, २१ ते २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण, २७ जूनला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर निदर्शने व धरणे, १ जुलैला कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणि अखेर मागण्यांची पूर्तता न झाल्यास १० जुलैपासून बेमुदत कामबंद करण्याचा पवित्रा कृषी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
कृषी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु
By admin | Published: June 14, 2017 12:36 AM