लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या नेतृत्वात प्रलंबित शिष्यवृत्ती मिळण्याचा मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयावर निदर्शने करून सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात, शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची भटकंती होत आहे. १८ मे रोजी एआयएसएफ ने सहायक आयुक्तांना निवेदन सादर केले. यात प्रलंबीत शिष्यवृत्ती बाबत संबंधित महाविद्यालयाची यादी दिली. त्यावर या विभागाने २० मे रोजी पी.पी. कॉलेज, कृषी तंत्र विद्यालय, सायत्राबाई मस्के कनिष्ठ महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय चिचगाव, जगत कॉलेज गोरेगाव, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय इत्यादीना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कुठल्या स्तरावर प्रलंबित आहे. कारणे काय आहेत? याबाबतचा अहवाल २३ मे पर्यंत सादर करण्यास सांगीतले. पण बहुतांश महाविद्यालयांनी या पत्राची दखलच घेतली नाही. सहायक आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगीतले की अनुदान प्राप्त संस्था शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविणे, त्रुट्या सुधारणे व पाठपुरावा करणे या बाबींकडे दुर्लक्ष करतात. या कारणाने प्रस्ताव प्रलंबीत राहतात व विद्यार्थ्यांना वेळेच्या आत शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यांनी आपल्या स्तरावर त्वरीत कार्यवाही करुन प्रकरणाचे निराकरण करुन शिष्यवृत्ती अदा करण्याचे आश्वासन दिले. एआयएसएफ ने याबाबद जिल्हा शिक्षणाधिकारी व संबंधित महाविद्यालयांवर आंदोलनाचा इशारा दिला. या आंदोलनात प्रामुख्याने जिल्हा संयोजक अर्पित बंसोड, क्रांती गणवीर, पूजा भौतिक, राकेश हिरदे, प्रशांत निकुशे, सोनू तिरपुडे, रितेश मेश्राम, मिताली भलावी, ज्योती सरजारे, आकांषी गडपायले, भाग्यवंता भौतिक आदि सहभागी झाले होते.
शिष्यवृत्तीसाठी एआयएसएफची निदर्शने
By admin | Published: June 11, 2017 1:10 AM