"अजित दादांच्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले"; निकालानंतर तटकरेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:17 PM2023-11-06T16:17:56+5:302023-11-06T16:21:09+5:30
सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना, अजित पवारांचा निर्णय योग्य असल्याचे जनतेने दाखवून दिल्याचं म्हटलं.
गोंदिया - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं असून भाजपा, शिंदे गट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे एक, दोन आणि तिसऱ्या क्रमांकाने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, महायुती सरकारमधील नेतेमंडळीला आनंद झाला असून आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना, अजित पवारांचा निर्णय योग्य असल्याचे जनतेने दाखवून दिल्याचं म्हटलं.
आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र, आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच, भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो असा आरोप करण्यात येतो. मात्र, ज्यावेळी भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी साहेबांची भेट घेतली होती मग ते काय होते? असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. गोंदियातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून ते बोलत होते.
दरम्यान, राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याबद्दल गोंदियाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा सन्मान करण्यात आला.
निवडणुकीत महायुतीला जोरदार यश
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यापैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर काँग्रेससोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत १३२२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महायुतीने तब्बल ७८८ जागांवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला २९२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर इतरांना १६२ ठिकाणी विजय मिळाला आहे.