कपिल केकत
गोंदिया : तिसऱ्या लाटेच्या भीतीने एकीकडे जेथे लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासनाची धडपड सुरू आहे, तेथेच दुसरीकडे विनाकारण लसीकरण टोलवून शासनाच्या उद्दिष्टाला छेद देण्याचे काम काही बेजबाबदार नागरिकांकडून केले जात आहे. यामुळेच मुदत संपूनही दुसरा डोस टोलविणाऱ्यांचा जिल्ह्यातील ग्राफ चढताच दिसून येत आहे. ३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघितल्यास १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस टोलवला होता. आता मात्र १६ सप्टेंबरपर्यंत तीच संख्या वाढून २,२१,१८७ एवढी झाली आहे.
कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा त्याच्याशी लढण्यासाठी हाती काहीच नसल्याने कोरोनाने कहर केला होता. मात्र, जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली व त्यानंतर मार्चपासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. मात्र, लस हाती असतानाही दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा जास्त कहर केला व कित्येकांच्या जीवलगांना घेऊन गेला. जेवढ्या जास्त प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे होते, तेवढे लसीकरण न झाल्याने कोरोनाला दुसऱ्या लाटेतही आपला डाव साधता आल्याचे दिसले. यामुळेच आता कोरोनाला थोपविण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण हा एकच सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.
त्यानुसार, शासनाने लसीकरणासाठी व्यापक मोहीम सुरू केली असून, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण हेच उद्दिष्ट ठेवून लसीकरणासाठी धडपड सुरू आहे. यात देशात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जिल्ह्यात ९१ टक्के लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे. ही जेवढी वाखाणण्याजोगी बाब, तेवढीच खेदाची बाब म्हणजे, कित्येक नागरिक विनाकारण लसीकरण टोलवत आहेत. यामध्ये मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघितल्यास १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस टोलवला होता. आता मात्र १६ सप्टेंबरपर्यंत तीच संख्या वाढून २,२१,१८७ एवढी झाली आहे.
-------------------------------------
४१,८५२ नागरिकांची पडली भर
लसीकरणाला घेऊन जिल्ह्यातील अभ्यास केला असता त्यात मुदत संपूनही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे दिसून आले. याला सविस्तर जाणून घेतले असता ३ सप्टेंबरपर्यंत १,७९,३३५ नागरिकांनी, तर १६ सप्टेंबरपर्यंत २,२१,१८७ नागरिकांनी दुसरा डोस टोलवल्याचे दिसले. म्हणजेच हा ग्राफ वाढतच चालला असून, १३ दिवसांच्या या अंतरात तब्बल ४१,८५२ नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस न घेतल्याचे दिसत आहे.
------------------------------
डोस पूर्ण न करणार व्यक्ती धोक्याची
दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही मनात धडकी भरवणारा असून, तो काळ कधीच परतून येऊ नये असे सर्वच म्हणतात. मात्र, त्यानंतरही लाखोंच्या संख्येत नागरिक लसीकरण टाळत आहेत ही बाब मात्र समजण्यापलीकडे आहे. यावरून कोरोनामुळे ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली, त्यांनाच याचे गांभीर्य आले असल्याचे म्हणता येईल. मात्र, लस न घेणारी व्यक्ती आजही समाजासाठी तेवढीच धोकादायक असल्याने आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तरी प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.