नरेश रहिले
गोंदिया : आपण मद्याचे शौकीन आहात तर सावधान ! स्वत:च्या घरीच आपला शौक भागवा अन्यथा आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल. शासनाच्या आदेशाला न जुमानता आपण आपला शाैक पूर्ण करण्यासाठी कोरोना पसरतोय याची काळजी घेत नसाल तर आपली खैर नाही. गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना आदेश देऊन त्वरित मद्यशौकिनांच्या अड्ड्यावर धाडी घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच या कारवाईला सुरुवात झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात १६ पोलीस ठाण्यांतर्गत येणारी ९६३ गावांमध्ये १४ लाखांवर लोक वास्तव्यास आहेत. गोंदिया जिल्ह्यात मद्य शौकिनांची काही कमी नाही. दारूबंदी असो किंवा नसो, तरीही मोठ्या प्रमाणात दारुड्यांना सहजरीत्या दारू उपलब्ध होते. दारू दुकाने, बिअरबार यात मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांवर कोरोनामुळे थोडा आळा बसला तरीदेखील मद्य शौकीन हे ढाबा, फार्महाऊस, खुले मैदान, शेत, हॉटेल यांचा आधार घेऊन आपल्या दैनंदिन पार्ट्या करीत आहेत. एक नव्हे दोन नव्हे तर अधिक लोकांचा घोळका तयार करून दारूची मौज लुटण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे. या दारुड्यांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन हे लोक करीत नसल्यामुळे आता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या मद्य शौकिनांच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अमंलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६ ही पोलीस ठाण्यातील कर्मचारी सायंकाळ झाली की सर्व मद्य शौकिनांचे अड्डे पिंजून काढत आहेत. ‘नो एक्सक्युज ओन्ली पनिशमेंट’ हेच ध्येय समोर ठेवून कारवाई केली जात आहे. मागील तीन दिवसात दारूबंदी कायद्यान्वये होत असलेल्या कारवायांत वाढ झाली आहे.
कोट
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. गर्दी करू नये, मद्य शौकिनांनी नियमात राहावे. कायदा तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शांतता व सुव्यवस्था राखणे हेच आमचे ध्येय आहे.
-विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया.