अर्जुनी मोरगाव : बोरटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक डी.एम. लोणारे यांच्या रक्त नमुन्याचा नागपूर येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतून अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर त्यांचेवर केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .प्राप्त माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, सहाय्यक गट विकास अधिकारी एम.डी. आंदिलवाड, पं.स. सदस्य रामदास मुंगणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गावळे, केंद्रप्रमुख वाय.बी. येल्ले यांनी बोरटोला येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी शिक्षक धाडू मन्साराम लोणारे हे शालेय वेळेत कर्तव्य बजावत असताना मद्यप्राशन करुन होते. त्यांना केशोरी पोलीस ठाण्यात आणून तक्रार करण्यात आली. केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय परीक्षण केले व रक्ताचे नमुने नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. या रक्तनमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यावरुन केशोरी पोलिसांनी शिक्षकांविरुद्ध कलम ८५ (१) मदाका अन्वये गुन्हा नोंदविला आहे . पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ मद्यपी शिक्षकावर अखेर गुन्हा दाखल
By admin | Published: October 09, 2016 12:44 AM