गोंदिया : मद्यशौकिनांमुळे वाढणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ढाबा, लॉज व हॉटेलात पार्ट्या करणाऱ्या मद्यशौकिनांवर करडी नजर ठेवली आहे. त्यासाठी गोंदिया पोलिसांनी जिल्हाभरातील लॉज, हॉटेल, ढाबा या ठिकाणी अचानक धाड घालून त्याची तपासणी करणे सुरू केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी १० पाेलीस ठाण्यांनी दमदार कारवाई केली आहे. १ ते ५ मार्च या पाच दिवसांची परिस्थिती पाहता १०७ हॉटेल, रेस्टाॅरंट, २४ लॉज तर १०७ ढाब्यांची पाहणी केली. या तिन्ही प्रकारच्या २३८ ठिकाणी पोलिसांची पाहणी केली असता, २४ ठिकाणी दारू पार्ट्या व फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना आदेश देऊन तत्काळ मद्यशौकिनांच्या अड्ड्यांवर धाडी घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात १६ पोलीस ठाण्यांपैकी १० पोलीस ठाण्यांनी कारवाई केली. त्यात गोंदिया शहर पोलिसांनी १४ हॉटेल/रेस्टाॅरंट, २ लॉज व १३ ढाब्यांची पाहणी केली. यात एका ठिकाणी पाच लोक दारू पित असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ५ हॉटेल/रेस्टाॅरंट, १६ ढाब्यांची पाहणी केली यात दोन ठिकाणी दोन लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलिसांनी २४ हॉटेल/रेस्टाॅरंट, ८ ढाब्यांची पाहणी केली, यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. तिरोडा पोलिसांनी ८ हॉटेल/रेस्टाॅरंट, ५ ढाब्यांची पाहणी केली, यात ६ गुन्ह्यांत ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गंगाझरी पोलिसांनी ६ ढाब्यांची पाहणी केली यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. दवनीवाडा पोलिसांनी ८ ढाब्यांची पाहणी केली, यात ४ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सालेकसा पोलिसांनी १ हॉटेल/रेस्टाॅरंटवर धाड घालून एकावर गुन्हा दाखल केला आहे. देवरी पोलिसांनी ४ हॉटेल/रेस्टाॅरंट, १५ ढाब्यांची पाहणी केली, यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित सहा पोलीस ठाण्यांनी तपासणी केली; परंतु त्यांना रंगेहाथ पकडण्यात यश आले नाही.