कशी चालणार रूग्णसेवा? : टीएमओ आणि एमओसह २५ पदे रिक्तसालेकसा : तालुक्यात सर्वसामान्य जनतेला वेळेवर व योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी एका ग्रामीण रुग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था शासनाने केलेली आहे. यात एकीकडे ग्रामीण रुग्णालय अनेकवेळा योग्य आरोग्य सेवा देण्यात कुचकामी ठरलेला आहे. तर दुसरीकडे चारही प्राथमिक आरोग्य केंद्रसुध्दा रुग्णसेवा देण्यात कमी पडत राहिले. त्यामुळे या तालुक्यात दरवर्षी आरोग्याविषयी कोणती ना कोणती समस्या निर्माण होत राहिली. आजघडीला चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन चालकांची पदे रिक्त आहेत. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. काही आजारांवर त्वरित उपचार मिळविण्यासाठी रुग्णांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर हलविणे आवश्यक असते. परंतु चारही आरोग्य केंद्रांत नियमित वाहक चालक नसतील तर रुग्णसेवा कशी देण्यात येईल? अशा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या वाहने आरोग्य केंद्रात शोपीस बनून आहेत. आरोग्य विभागाला आपल्या उपयोगासाठी वाहनांचा उपयोग करायचा असेल तर एखाद्या कंत्राटी वाहन चालकास बोलावून काम केले जातात. सध्या तालुक्यातील कावराबांध सातगाव, बिजेपार आणि दरेकसा या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाची एकूण २४ पदे रिक्त आहेत. तसेच मागील दोन वर्षांपासून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचेही पद रिक्त असून आमगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी (टीएमओ) यांना सालेकसाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून एकूण आठ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सहा पदे भरलेली असून कावराबांध आणि दरेकसा हे एकच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर चालत आहे. तालुक्यात एकूण तीन आयुर्वेदिक दवाखाने आहेत. तिन्ही ठिकाणी एकेक वैद्यकीय अधिकारी मंजूर असून पदे भरलेली आहेत. यात कावराबांध अंतर्गत सोनपुरी, सातगाव अंतर्गत गांधीटोला आणि दर्रेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिपरिया येथील आयुर्वेदिक दवाखान्याचा समावेश आहे. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखान्यात औषधोपचार देण्यापेक्षा संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्त वेळा आपली सेवा देतात किंवा तेथील वैद्यकीय अधिकारी (एमओ) यांचा उपयोग करून घेत असतात, अशी सर्वसामान्य जनतेची ओरड आहे. आरोग्य सहायकांची आठ पदे मंजूर असून त्यापैकी सहा भरलेली आहेत. सातगाव आणि बिजेपार येथे प्रत्येकी एक पद रिक्त पद आहे. आरोग्य सहायिकाचे चार पदे मंजूर असून दोन भरले व दोन रिक्त आहेत. सातगाव आणि दर्रेकसा येथे आरोग्य सहायिका नाहीत. कनिष्ठ सहायकाचे चार पद असून तीन भरलेली आहेत. कावराबांध येथील पद रिक्त आहे. औषध निर्मात्यांची एकूण चार पैकी तीन पदे भरलेली असून दर्रेकसा येथील पद रिक्त आहे. प्रयोग शाळा तंत्रज्ञांची चारही पदे भरलेली आहेत. आरोग्य सेवेसाठी सर्वात महत्वाचा घटक आरोग्य सेविका असून सर्वात जास्त रिक्त पदे त्यांचीच आहेत. तालुक्यात एकूण २६ पदे मंजूर असून आठ पदे आरोग्य सेविकेचे रिक्त आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र बिजेपारसह झालीया, बाह्मणी, सोनपुरी, सातगाव, धानोली, पिपरिया आणि मानागढ येथे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. आरोग्य सेवकांचे (एमपीडब्ल्यू) २२ पदे असून २१ भरले आहेत. झालीया उपकेंद्रातील पद रिक्त आहे. परिचराचे १९ पदे मंजूर असून त्यापैकी कावराबांध येथील एक पद रिक्त आहे. स्वच्छकांचे चार पदे मंजूर असून सातगाव, बिजेपार येथे सफाईगाराचे पद रिक्त आहे.एकंदरीत तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत एकूण ११० पदे मंजूर असून ८६ पदे भरलेली आहेत तर २४ पदे रिक्त आहेत. अर्थात २२ टक्के पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. काळवेळप्रसंगी एवढी धावपळ होते की, आरोग्य सेवा कोलमडून जाते. (तालुका प्रतिनिधी)
चारही केंद्रांना रिक्त पदांनी ग्रासले
By admin | Published: May 27, 2016 1:44 AM