गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी (दि.२३) जाहीर झालेल्या निकालाने जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा चारही मतदारसंघांतून सुपडा साफ केला, गोंदिया विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी या मतदारसंघात कमळ फुलवीत प्रथमच इतिहास घडवला. तिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी विजयाची हॅटट्रिक साधत रेकॉर्ड स्थापन केला. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले व आमगाव मतदारसंघातून भाजपचे संजय पुराम यांनी जोरदार कमबॅक करत मतदारसंघात इतिहास घडवला आहे.
"मतदारसंघातील समस्त जनता व कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा विजय अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील जनतेने नेहमीच आपल्याला साथ दिली. हा विजय जनतेच्या प्रेम आणि विश्वासाचा विजय होय. जनतेने पुन्हा विकासाला साथ दिल्याची पावती आहे. खा. प्रफुल्ल पटेल व महायुतीच्या नेत्यांनी आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरविला. यात समस्त कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे." - राजकुमार बडोले, आमदार, अर्जुनी-मोरगाव
विजयाची कारणेसाधा माणूस अशी प्रतिमा व मतदारसंघात कायम ठेवलेला जनसंपर्क, खा. प्रफुल्ल पटेल व महायुतीची मिळालेली भक्कम साथ, महायुतीच्या विकासात्मक योजना, लाडक्या बहिणींची मिळालेली साथ.
जनतेने पुन्हा विकासाला प्राधान्य देत साथ दिली "तिरोडा विधानसभा मतदारसंघातील जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास आणि प्रेम कायम ठेवले असून, हा विजय त्याचीच पावती आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन महिने घेतलेले परिश्रम आणि नेते आणि पदाधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधत केलेल्या नियोजनाने विजयाचा हा पल्ला गाठण्यात यश आले. हा विजय जनतेला समर्पित आहे."- विजय रहांगडाले, आमदार, तिरोडा
विजयाची कारणे गेली १० वर्षे मतदारसंघात केलेली विकासकामे ही जमेची बाजू ठरली. आपला माणूस आणि मतदारसंघाशी जुळलेली नाळ वरली प्रभावी. महायुतीतील घटक पक्षांचा योग्य समन्वय आणि मिळालेली भक्कम साथ.
हा विजय महायुतीचे कार्यकर्ते अन् सर्वसामान्य जनतेचा "आजचा विजय हा महायुतीच्या समस्त कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असून, सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा आधीपेक्षा अधिक विश्वास महायुतीवर व्यक्त केला आहे. या विजयात लाडक्या बहिणींनासुद्धा विसरून चालणार नाही. त्याही विजयाच्या शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो." - विनोद अग्रवाल, आमदार, गोंदिया
विजयाची कारणे महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराचे केलेले सूक्ष्म नियोजन व व्यापक जनसंपर्क, गत पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारसंघाची बांधणी. मतदानाचा टक्का वाडविण्यात लाडक्या बहिणींची मिळालेली साथ.
हा जनतेच्या प्रेम आणि विश्वासाचा विजय "आमगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने सर्व अंदाज खोटे ठरवत आपल्यावर प्रेम आणि विश्वास कायम ठेवीत संधी दिली. त्यामुळे हा विजय जनतेचा आणि महायुतीच्या समस्त कार्यकर्त्यांचा आहे. जनतेने पुन्हा एकदा विकासकामांना प्राधान्य देत महायुतीला भक्कम साथ दिली आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही." - संजय पुराम, आमदार, आमगाव
विजयाची कारणेपदावर नसतानाही मतदारांशी कायम ठेवलेला जनसंपर्क, निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांची मिळालेली भक्कम साथ. लाडकी बहीण योजना व महायुतीची विकासकामे ठरली प्रभावी.