केशोरी : केशोरी हे गाव या परिसरातील गावांचे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. स्थानिक नागरिकांबरोबर बाहेर गावातील नागरिक येथे नेहमीच साहित्य खरेदीसाठी येतात. जिल्हा अनलॉक झाल्यानंतर पुन्हा गर्दी वाढली आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे म्हणून दुकानात येणारे ग्राहकांना सूचना देवून नियमांचे पालन करावे असे ठाणेदार संदीप इंगळे यांनी कळविले आहे.
केशोरी येथे गेल्या महिन्यात कोरोना विषाणूच्या महामारीने घातलेला कहर सर्वांनी अनुभवला आहे. कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा दुकानांमध्ये गर्दी करणे टाळावे शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीला मे महिन्यामध्ये सतत पोलीस कर्मचाऱ्यांची दिवस रात्र सेवा अर्जीत करुन नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळेच कोरोना संसर्गावर आळा बसण्यासाठी मदत झाली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने केशोरीसह परिसरात मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला होता. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला हे विसरुन चालणार नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने लॉकडाऊन शिथील करुन व्यवहार नियिमत व सुरळित सुरु करण्यात आले आहे. मात्र प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. निर्बंध शिथिल होताच येथे गर्दी होतांना दिसत आहे. कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडणे हे चुकीचे आहे. बाहेर विनाकारण फिरणे, घरगुती समारंभ टाळावे प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे असून आपले कुटूंब सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी, तसेच छाेट्या आणि मोठ्या व्यावसायीकांनी काळजी घ्यावी.