लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : १ कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८ रुपयांच्या धान घोटाळा करणाऱ्या ग्राम गोर्रे येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह इतर सर्व संचालक तसेच उपप्रादेशिक व्यवस्थापक आणि विपणन निरीक्षक यांसह एकूण १४ जणांविरोधात आदिवासी विकास महामंडळाने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस त्यांच्या शोधात असताना सर्व संचालक अद्याप फरार असून बाहेर फिरत न्यायालयातून जामिनासाठी धावपळ करीत असल्याचे बोलले जात आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने ग्राम गोर्रे येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था (१०४५) मार्फत पणन हंगाम २०२१-२२ अंतर्गत खरीप हंगामात १४५८०.४० क्विंटल धान खरेदी केली. तसेच रब्बी हंगामात ३१०१५.४० क्विंटल धान धान खरेदी दाखविण्यात आली. सोसायटीने एकूण धान खरेदी ४५५९५.८० क्विंटल एवढी दाखविली. त्यांपैकी सोसायटीने ३६८३२.३३ क्विंटल धानाचा पुरवठा महामंडळाकडे केला; तर ८६३.४७ क्विंटल धान महामंडळाला दिले नाही. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी संस्थेच्या गोदामात तपासणीसाठी आले असता, त्यांना फक्त १५० क्विंटल धान आढळून आले. अर्थात एकूण ८६१३.४७ क्विंटल धान सोसायटीने गबन केले असून महामंडळाला दिलेच नाही. त्याची किंमत अंदाजे १ कोटी ६७ लाख १० हजार १३१ .८० रुपये एवढी होते. तसेच या सोसायटीने नवा आणि जुना बारदाना एकूण २५ हजार ६३४ क्विंटल हासुद्धा महामंडळाकडे दिला नसून त्याची किंमत १० लाख २७ हजार ८०७ रुपये एवढी आहे. धान खरेदी केंद्राचे संचालक, विपणन निरीक्षक आणि उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी संगनमत करून धान आणि बारदाना मिळून एकूण १ कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८.८० रुपयांच्या धान आणि बारदान्याचा घोटाळा केल्याचा प्रकार आदिवासी महामंडळासमोर उघडकीस आला. त्यामुळे आदिवासी महामंडळाचे लेखा व्यवस्थापक सागर भागवत यांनी शुक्रवारी (दि. १४) सालेकसा पोलीस ठाण्यात गोर्रे येथील धान खरेदी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, विपणन निरीक्षक व उपप्रादेशिक व्यवस्थापकांविरुद्ध कायदेशीर लेखी तक्रार केली व सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत संचालकांना माहिती होताच त्यांनी पोलिसांच्या हाती येण्यापूर्वीच गावातून पळ काढला आहे. बाहेरूनच ते आता न्यायालयातून जामीन मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. ३ दिवसांपासून फरार आरोपींना सालेकसा पोलीस शोधत असून प्रकरणाचा तपास पीएसआय अमोल मुंडे करीत आहेत.
या लोकांविरुद्ध पोलिसांत तक्रार- या प्रकरणात संतोष सदनलाल मडावी (मरकाखांदा), शिवाजी एन. कोसमे (सीतेपाला), अरुण मनमोनी फुंडे (सिंधीटोला), जयलाल हरू पटले (गोर्रे), हिरामण जिंदाफोर (सीतेपाला), झाडू अडकू गावड (जोशीटोला), खोदूलाल टेकाम (शिकारीटोला), राम लालसू सिरसाम (मानागड), अनिल मनमोहन फुंडे (सिंधीटोला), प्रभारी विपणन निरीक्षक मुंजा एन. इंगळे (नाशिक), प्रभारी विपणन निरीक्षक चेतन जुगनाखे (देवरी), रोजंदारी प्रतवारी कार गजानन मरसकोल्हे (देवरी), उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष श्रीनाथ मुळेवार (देवरी) यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.