दुकानांमध्ये गर्दी : ईदच्या तयारीची सर्वत्र धूम लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रमजान ईद म्हणताच ‘शिरखुरमा’ डोळ््यांसमोर येतो. शेवयांच्या या पदार्थाचे मुस्लीम धर्मात महत्वाचे स्थान असतानाच या शेवया अन्य धर्मीयांच्याही आवडत्या आहेत. यामुळेच शहरातील बाजारात ईदची धूम दिसून येत असतानाच शेवयांच्या दुकानांत सध्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही गर्दी फक्त मुस्लीमबांधवांचीच नसून अन्य धर्मीयही शेवया खरेदी करीत आहेत. रहमान प्रमाणेच रमजान हे अल्लाह चे नाव असल्याने रमजानला अल्लाहचा महिना म्हटले जाते. त्यामुळेच मुस्लीम धर्मात सर्वात पाक (पवीत्र) महिना म्हणून रमजान मानला जातो. ३० दिवस कालावधींचा असून इस्लामी वर्षाचा हा नववा महिना आहे. या रमजान महिन्यात रोजा (उपवास) केले जातात. महिनाभर केलेल्या पूजेच्या मोबदल्यात अल्लाह आनंद साजरा करण्याची संधी देतात व त्यालाच ‘रमजान ईद’ म्हटले जाते. यात ईदची नमाज अदा करण्यासाठी घरून निघताना तोंड गोड करून निघावे लागते. तेव्हा सेवई व खजूर खायची परंपरा आहे. त्यामुळेच रमजान ईदमध्ये सेवई व खजूरचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच शहरात सध्या शेवयांच्या दुकानी थाटण्यात आल्या आहेत. सोमवारची (दि.२६) ईद येत असल्याने शहरातील बाजारात सध्या मुस्लीमबांधवांची एकच गर्दी दिसून येत आहे. यात घरातील सामान, कपडे यांच्यासह शेवई खरेदी केली जात आहे. गोंदिया शहरात सेवईची दुकाने सजली आहेत. सर्व धर्मीयांची आवडती शेवई शेवई फक्त मुस्लीमबांधव खातात असे नसून त्याचे चाहते सर्वधर्मीय आहेत. शुद्ध शाकाहारी असा हा पदार्थ असून सर्वच मोठ्या आवडीने या शेवयांची खीर तयार करून खात असतात. मुस्लीम समाजात खीरला महत्व असल्याने शेवयांची खिर म्हणजेच ‘शिरखुरमा’ त्यांच्यात प्रसिद्ध आहे. तर अन्य धर्मात शेवयांची खिर आपापल्या पद्धतीने तयार केली जात असल्याचे येथील शेवई विक्रेत्यांनी सांगितले.
शेवयांनी घातली सर्वांनाच भुरळ
By admin | Published: June 26, 2017 12:22 AM