लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मिनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला सुपूर्द करण्यात आली. यापैकी मिनी व्हेंटिलेटरचे वितरण आयुष्य हॉस्पिटल, एम. एस. आयुर्वेद सेंटर, गायत्री हॉस्पिटल, कल्पतरू हॉस्पिटल आणि मरारटोली येथील नियोजित कोविड सेंटरला करण्यात आले. आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संपूर्ण गोंदिया विधानसभेतील नागरिकांच्यावतीने आभार मानले आहेत. शासकीय तसेच मोठ्या खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, काही लहान रुग्णालयांत व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने अचानक रुग्णाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यावर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास व्हेंटिलेटर असलेल्या ठिकाणी त्याला स्थानांतरित करावे लागते. छोट्या रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने त्याऐवजी मिनी व्हेंटिलेटरचा वापर केला जातो. जोपर्यंत इतर रुग्णालयातून व्हेंटिलेटरची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत मिनी व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णांची देखभाल केली जाते. त्यामुळे मिनी व्हेंटिलेटर हे छोट्या रुग्णालयांना देण्यात आल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.