गोंदिया नगर पालिकेचा दुबळेपणा : २०१० पासून सूतिकागृह बंद गोंदिया : खासगी डॉक्टरांना भली मोठी फी मोजण्याची क्षमता नसलेल्या सामान्या परिवारातील गर्भवती महिलांसाठी आधार असलेल्या धोटे सुतिका गहाला कायमचे टाळे लावण्यात आले आहे. पालिकेची आर्थीक स्थिती कमकुवत असल्याने तसा ठराव घेण्यात आला असू सन २०१० पासून सुतिकागृह मरणासन्न अवस्थेत उभे आहे. सन १९५७ मध्ये धोटे सुतिका गृहाची स्थापना करण्यात आली. आजघडीला ज्या प्रमाणात शहरात प्रसुतीची सोय उपलब्ध आहे. पूर्वी तेवढी सोय नसल्याने शिवाय खाजगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणारी फी मोजण्याची परिस्थिती नसल्याने शहरातील बहुतांश प्रसुती याच धोटे सुतिका गृहातून होत होती. याच सुतिका गृहातून कित्येकांचे पाळणे हालले आहे. मात्र बदलत्या काळानुरूप शहरातील स्थितीही बदलत गेली. पूर्णपणे पालिकेला आपल्या तिजोरीतून हे सुतिका गृह चालवावे लागत होते. शासनाकडून एका पैशाची मदत होत नसल्याने पालिकेलाही हे सुतिका गृह चालविणे कठीण जात होते. सुतिका गृहात दोन नर्सेस, दोन लिपीक, तीन सफाई कामगार, सहा आया यांच्यासह चपराशी व चौकीदार कार्यरत होते. यातील सुमारे अर्धे कर्मचारी स्थायी तत्वावर होते. अशात या कर्मचाऱ्यांचे पगार, औषधी व अन्य खर्च पकडून पालिकेला मोठा खर्च या सुतिका गृहाकरिता वहन करावा लागत होता. एकीकडे पालिकेचीच आर्थिक स्थिती हलाखीची असताना त्यात सुतिका गृहावर होणारा खर्च म्हणजे आमदनी अठण्णी व खर्चा रूपय्या अशातला प्रकार होत होता. शिवाय महिलांसाठी शहरात स्वतंत्र शासकीय दवाखान असल्याने धोटे सुतिका गृहातील रूग्णांची संख्याही नगण्य झाली होती. तसेच सुतिका गृहाची इमारत जीर्णावस्थेत आल्याने एखाद्यावेळी कुणाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची टाळता येत नव्हती. परिणामी पालिकेने १ एप्रिल २०१० पासून धोटे सूतिकागृह बंद करण्याचा ठराव पारीत केला व सूतिकागृहाला कायमचे टाळे लावण्यात आले. (शहर प्रतिनिधी)इमारत जीर्णावस्थेत सन १९५७ पासून सुरू झालेल्या धोटे सुतिका गृहाची इमारत अत्यंत जिर्णावस्थेत आली आहे. इमारतीच्या भिंती तडकून त्यातून झाडे उगवू लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आजघडीला या इमारतीचा अन्य दुसऱ्या कामासाठी वापर करायचा म्हटले तरिही ही अत्यंत धोकादायक बाब ठरणार आहे. सुतिका गृह बंद करण्यामागचे हे ही एक महत्वाचे कारण होते.सुतिका गृह बंद होऊन आता पाच वर्षांचा कालावधी होत असल्याने येथे मानवी वावर निरंक झाला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम पडल्यास एखाद्यावेळी येथे कुणी जात असतो. त्यामुळे आता आॅटोवाल्यांनी या इमारतीच्या आवाराचा आॅटो स्टँड स्वरूपात वापर करण्यास सुरूवात केली आहे. आता धोटे सुतिका गृहाच्या दर्शनी भागातील पोर्च मध्ये आॅटो उभे राहतात.सूतिकागृहातील रूग्णांची संख्या नगण्य शहरात बाई गंगाबाई शासकीय स्त्री रूग्णालय आहे. महिलांसाठी येथे शासनाकडून सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. तज्ज्ञ डॉक्टर व अन्य सुविधा येथे उपलब्ध असल्याने नागरिकांना कल बाई गंगाबाई रूग्णालयाकडे वाढू लागला. परिणामी सुतिका गृहातील महिलांची संख्या नगण्य झाली होती. शिवाय अत्याधुनिक सोयी सुविधा सुतिका गृहात उपलब्ध करवून देणे पालिकेसाठी अशक्य होते. त्यामुळेही सुतिका गृहाकडे शहरवासीयांनी पाठ फिरविली होती.
धोटे सूतिकागृहाला कायमचे टाळे
By admin | Published: April 18, 2015 12:35 AM