विजय मानकर
सालेकसा (गोंदिया) : हलबीटोला (ता. सालेकसा) येथील कन्या भाग्यश्री श्यामलाल नाईक या महिला बीएसएफ जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून आलेल्या ड्रोनला मारून पाडले. प्रथमच एका महिला बीएसएफ जवानाने ड्रोन मारून पाडण्याचा नवा कीर्तिमान घडविला आहे. त्यांच्या या अद्भुत पराक्रमामुळे सालेकसावासीयांची मान उंचावली आहे.
पाकिस्तानकडून सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून मादक पदार्थ तसेच शस्त्र पाठविण्याचा क्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळी भारतीय लष्करातील जवान पाकिस्तानच्या या कारवाईवर सडेतोड उत्तर देताना त्यांच्याकडून पाठवलेले ड्रोन मारून पाडत असतात. परंतु, यावेळी ड्रोन पाडणाऱ्यांमध्ये प्रथम दोन महिला बीएसएफ जवानांच्या समावेश आहे. त्यामध्ये हलबीटोला- सालेकसा येथील भाग्यश्री श्यामलाल नाईक व तिची सहकारी बीएसएफ जवान प्रीती हिने सीमा ओलांडून येणाऱ्या पाकिस्तान ड्रोनला मारून खाली पाडले. त्या ड्रोनमध्ये पाकिस्तानकडून पाठविण्यात आलेले २.२० किलो ग्रॅम हेरॉइन जप्त केले आहे.
२५ नोव्हेंबरला सीमेवरून पाकिस्तानने ड्रोनद्वारे आठ पिस्टल पाठविले होते. तेही भारतीय जवानांनी ड्रोनला मारून जप्त केले होते. त्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी पाकिस्तान पंजाब प्रांताच्या अमृतसरनजीक रामदास हेक्टरअंतर्गत दरिया मुसा येथील चाहाडपूर गावाजवळ सीमेवरून ड्रोनद्वारे भारतात हेरॉइन मादक पदार्थ पाठवले होते. त्यावेळी सीमेवर हलबीटोला येथील भाग्यश्री आणि तिची सहकारी प्रीती या दोन बीएसएफ महिला जवान गस्तीवर होत्या. रात्री ११.०० वाजण्याच्या दरम्यान त्यांना सीमेवरून ड्रोन आल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी ड्रोनच्या दिशेने सतत २५ फेऱ्या फायर केल्या. काही वेळानंतर ड्रोनच्या हालचाली शांत झाल्याचे कळले, तेव्हा शहानिशा करण्यासाठी गेले असता मारून पाडलेला ड्रोन एका शेतात पडून होता. त्या ड्रोनमध्ये २.२० किलोग्रॅम हेरॉइन आढळून आले.
मादक पदार्थांसाठी ड्रोनचा वापर
पाकिस्तानकडून नेहमी पंजाब प्रांतात मादक पदार्थांचा पुरवठा केला जातो. याचे दुष्परिणाम पंजाब येथील युवा वर्गावर होत आहेत. भाग्यश्रीने केलेली कारवाई अदम्य प्रकरणाचे प्रतीक मानली जात आहे. सीमेवरून येणारा ड्रोन मारून पाडणारी भाग्यश्री ही प्रथम बीएसएफ महिला जवान ठरली आहे.
भाग्यश्रीचा होणार सन्मान
सालेकसा मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हलबीटोला येथील भाग्यश्री नाईक हिची नियुक्ती सीमा सुरक्षा दलात १ मार्च २०२१ ला झाली होती. त्यानंतर ३१ मार्च २०२२ पर्यंत तिचे लष्करी प्रशिक्षण झाले आणि आता ती पंजाब प्रांतात अमृतसरनजीक भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्यावर तैनात आहे. तिच्या पराक्रमामुळे लष्कराच्या वतीने तिला सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.