गोंदिया :राज ठाकरे हे मागच्या लोकसभेत भाजपला 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत होते. काही महिन्यांपूर्वी हेच राज ठाकरे मशिदीवरून भोंगे काढा, असे म्हणत होते. मात्र, ते भोंगेही सुरू आहेत अन् हनुमान चालिसा एकाही भोंग्यासमोर म्हटली गेली नाही. राज ठाकरे त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकार, शिवसेनेला विरोध करीत होते. आता भाजप त्याच राज ठाकरेंना मित्र बनवू पाहत आहे. कारण राज ठाकरेंची भाषा आणि वर्तन आहे ते भाजपशी मिळते-जुळते असून भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणजे राज ठाकरे असल्याची खोटक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुसंवाद बैठक मंगळवारी (दि. २०) येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेने तर राजकारण केले नाही, ज्यांना राजकारणाची खुमखुमी आहे त्यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करणाऱ्याला आम्ही शिवतीर्थावरच उत्तर देणार असल्याचा इशारा दिला. शिवसेनेचा दसरा मेळावा आजपर्यंत जिथे झाला तिथेच होणार, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गोंदिया येथील अत्याचारपीडित महिलेच्या कुटुंबीयांशी दानवे यांनी भेट घेऊन शासकीय योजनेमार्फत काही लाभ मिळावा यासाठीदेखील प्रयत्न करू, असे सांगितले.