आक्षेप मागविले : आठ ग्रामपंचायतींचा होणार समावेश गोंदिया : आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळविण्यासाठी नागरिकांनी शासनाकडे लावून धरलेली मागणी सार्थकी लागण्याचे संकेत मिळत आहेत. परिसरातील आठ ग्रामपंचायतींचा यात समावेश होऊ शकतो. त्यासाठी संबंधित ३० दिवसात आक्षेप मागविण्यात आले आहेत. आमगाव ग्रामपंचायत तालुकास्थळ असल्याने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमांंतर्गत तरतुदीनुसार जिल्ह्यातील आमगाव ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमीत होणारे क्षेत्र विनिर्दिष्ट करुन नगर पंचायतची अधिसूचना काढली होती. सदर शासन निर्णयाप्रमाणे नागरिकांनी शासनाला नगर पंचायतऐवजी नगर परिषदेचा दर्जा मिळावा यासाठी लढा उभारला होता. त्यामुळे ग्रामपंचायत येथे प्रशासकांचा कारभार सुरू आहे. शासनाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आमगाव ग्रामपंचायत येथील प्रशासकांचा कारभार विकासाला पोषक ठरला नाही. शासनाच्या योजना व निधी हातात असून सुद्धा विकासाला चालना मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये वाढता असंतोष शिगेला पोहोचला आहे. याची जाणीव हातात घेवून नागरिकांनी आमगाव कृती समिती गठीत करुन शासनाकडे ग्रामपंचायत अथवा नगर परिषदचा निर्णय तात्काळ घेण्यासाठी आंदोलन उभारले होते. कृती समितीने २६ डिसेंबर २०१६ ला मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना पत्र लिहून नागरिकांच्या मागणी व समस्यांकडे लक्ष वेधून निर्णय घेण्यासाठी निवेदन सोपवून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. राज्य शासनाने आमगाव येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबत ६ जानेवारीला उद्धोषणा काढून अधिनियमाच्या तरतुदीनुसार आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, पदमपूर, किंडगीपार, बिरसी व माल्ही या ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी उद्धोषणा घोषित केली आहे. त्यामुळे शासनाकडून नगर परिषद स्थापनेला हिरवा कंदील मिळाला असून फेब्रुवारीपर्यंत नगर परिषदेचे प्रारुप ठरण्याची शक्यता आहे.(शहर प्रतिनिधी)
आमगाव नगर परिषदेच्या स्थापनेला आली गती
By admin | Published: January 11, 2017 1:57 AM