मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी (गोंदिया) : झाडीपट्टी असो किंवा आपला विदर्भ या मातीत अनेक नामवंत कलावंत घडले आहेत. या मातीने हौशी कलावंतांपासून तर चित्रपटसृष्टीतील कलाकार घडविले आहेत. अनेकांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेण्याचे काम या झाडीपट्टीतील कलावंतांपासून प्राप्त झाले आहे. खरा कलाकार हा लोकनाट्य व लोककलेमुळे निर्माण झाला आहे. यातून कलाकारांना मोठे यश गाठता आले म्हणूनच ग्रामीण भागातूनच लोकनाट्य व लोककलेचा कलावंत उत्तम घडला आहे.
दिवसभराच्या कष्टाने दमलेल्या माणसांची पावले सायंकाळ झाल्यावर देवळाकडे वळायची. भजन आणि कीर्तनात रंगणारी ती माणसे कधीकधी कीर्तन, भारूडातील प्रसंगांनी खदखदून हसू लागायची. तमाशा, लावणीने देहभान हरपून जायची. पोवाड्यांनी अंगावर शहारे उभे राहायचे. धकाधकीच्या, कष्टाच्या, दुःखाच्या क्षणांनी भांबावलेल्या मराठी माणसाला आपल्या कलांद्वारे मोहीत करण्याची किमया साधणाऱ्या या लोककला आणि लोककलावंत आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. गोंधळ, जागरण, तमाशा, लावणी, भजन, कीर्तन, बाल्या नृत्य, दशावतारी खेळ, लळीत या काही प्रमुख लोककलांनी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचे मन रिझवून टाकले. त्या जोडीला वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, भुत्या, नंदीबैलवाला, शाहीर, सुंबरान गाणारे धनगर, पोतराज, कडकलक्ष्मी यांनीही मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले. लोककला या संबंधित संस्कृतीच्या प्रवाहक असतात.
जागरण गोंधळाला पसंती आजही
गोंधळाबरोबरच जागरणाला महत्त्वाचे स्थान आहे. कुळधर्म कुलाचार पाळला जावा म्हणून जागरण केले जाते. आपापल्या कुलस्वामीला जागृत करणे म्हणजे जागरण. घरामध्ये शुभकार्याच्या वेळी जागरण गोंधळ घातला जातो. त्याप्रमाणे दर वर्षाला किंवा तीन वर्षांनी कुळधर्म कुलाचारावेळी जागरण गोंधळ घातला जातो.
लावणी तर महाराष्ट्राची शान
गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा संगम असलेली लावणी हा लोकप्रिय कलाप्रकार आहे. तमाशाचा भाग म्हणूनही लावणी सादर केली जाते. शृंगारावर आधारलेल्या लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बालक्रीडेचे अभंग यात आढळून येते. शाहिरांनी या लावण्यांची लज्जत वाढवली. शृंगारीकच नव्हे, तर भक्तीरस, वीररस, वात्सल्यरस असलेल्या लावण्याही शाहिरांनी रचल्या. लावणीविषयी असे म्हटले जाते की, लवण म्हणजे मीठ आणि मीठाशिवाय जेवणाला चव नाही. त्याप्रमाणे लावणीशिवाय मनोरंजनाच्या कार्यक्रमाला लज्जत येत नाही. मात्र, सध्याची लावणी आणि लावणी कलावंत यांची स्थिती दयनीय झाली आहे.
तमाशातून कलावंत जगतोय
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलेत तमाशाचा उल्लेख करावा लागतो. गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांचा परिपोष असलेली ही लोककला आहे. तमाशा हा मूळ शब्द अरबी आहे. त्याचा अर्थ दृश्य, खेळ किंवा नाट्यप्रयोग असा आहे. या खेळात गण- गौळण, रंगबाजी आणि वग अशा तीन प्रकारच्या नाट्यांनी रंगत येत असते. गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. गण संपल्यावर ढोलकी वादन होते. त्यानंतर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते. त्यानंतर गौळण. रंगबाजी म्हणजे रंगमंचावर होणारे श्रृंगारीक लावण्यांचे सादरीकरण.
कीर्तनातून आजही प्रबोधन सुरूच
परमेश्वर आणि थोर विभूतींचे गुणगान; तसेच पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन लोककला प्रकार आहे. काव्य, संगीत, अभिनय आणि काहीवेळा नृत्य यांच्या संगमातून सादर झालेले कथारूप एकपात्री निवेदन म्हणजे कीर्तन. कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तनाला मोठी परंपरा आहे. भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा प्रारंभ केला. त्यांनी महर्षी व्यासांना ही लोककला शिकवली.
भारूडाचीही छाप कायम
रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सांगणारी लोककला म्हणजे भारूड. समाजाला समजेल, अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगून सदाचार आणि नीतिवर भर देणारे असे भारूड आहे. जीवनाचे अवलोकन आणि चिंतन भारूडांमधून व्यक्त झालेले दिसते. संतांनी समाजप्रबोधनपर भारूडे रचून लोकांच्या डोळ्यांत अंजन घातले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव या संत एकनाथपूर्व आणि संत तुकाराम आणि संत रामदास या संत एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारूडे रचली. संत एकनाथांनी भारूडात विविधता आणली.