गोंदिया : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता गोंदिया-बालाघाट मार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने विविध अंगणवाडी संघटनांनी ५ ऑक्टोबरला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हा शाखेच्या नेतृत्त्वात गुरूवारी जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जयस्तंभ चौक येथून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आणि फडणवीस सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची दखल न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बाप्पाच्या, असे नारे देत शासनाचा निषेध नोंदविला. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नेहरु चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी शासनाचा निषेध नोंदवित स्वत:हून पोलिसांना अटक दिली. अटक देण्यापूर्वी शेकडो अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेऊन काहीवेळानंतर त्यांची सुटका केली.
मोर्चादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्त्व हौसलाल रहांगडाले, शंकुतला फटींग, आम्रकला डोंगरे, जिवनकला वैद्य, बिना गौतम, ब्रिजुला तिडके, सुनीता मलगामे, विजया डोंगरे, प्रेमलता तेलसे, लिलावती रहांगडाले, सविता मोवारे, शंकुतला गोडाने, कल्पना पटले, उषा लांजेवार, कविता सहारे, पदमेश्वरी बिसेन, सुनीता रहमतकर, शारदा खोब्रागडे, मंगला शहारे, कांता डोंगरवार यांनी केले.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या रास्त आहेत. मात्र शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मागण्या त्वरीत पूर्ण झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करु. हौसलाल रहांगडाले, आयटक जिल्हाध्यक्ष
सरकारने प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देऊन अंगणवाडी सेविकांची दिशाभूल केली. पण आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही.- प्रेमलता तेलसे, अंगणवाडी सेविका
प्रमुख मागण्या - अंगणवाडी सेविकांना १० हजार ५०० रुपये मानधन द्या- अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात दरवर्षी १० टक्के वाढ करा, - १५ दिवसांची आजारी रजा लागू करा- अंगणवाडी व मदतनीस यांचे थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे.- प्रवास भत्त्याचे थकीत देयक त्वरीत देण्यात यावे.- पेशंनची प्रकरणी त्वरीत निकाली काढण्यात यावी.