वीज पुरवठा खंडित : सुमारे सवा लाख ग्राहकांना फटकागोंदिया : मागील चार दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला आहे. या पावसामुळे जन जिवनासह प्रामुख्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला आहे. कोठे झाडे पडल्याने तर कोठे तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असून यामुळे अवघा जिल्हाच अंधार गुडूप झाल्याचे चित्र आहे. यात प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याला जबर फटका बसला आहे. तर जिल्ह्यातील सुमारे सवा लाख वीज ग्राहक अंधारात असल्याची माहिती आहे. मृगाच्या सुरूवातीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्हात काय अवघ्या राज्याला रडवून सोडले होते. पावसा अभावी बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला असून सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. सर्वांच्या मनातील ही आर्त हाक वरूणदेवताने ऐकली व मागील चार-पाच दिवसांपासून विदर्भात ठाण मांडला. राज्यासह अवघे विदर्भ पाणी-पाणी झाले असून यात विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात सर्वाधीक पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर आज, बुधवारीही पाऊस सकाळपासूनच बरसतच होता. या संततधार पावसामुळे नदी-नाले ओथंबून वाहत असून दळण-वळणाचे मार्ग बंद पडले. शिवाय पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कोठे घरे व गोठे पडली, तर कोठे जनावरांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार घडत असतानाच वादळवारा व पावसामुळे जिल्ह्यात विद्युत विभागाचे चांगलेच नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडीत झाल्याने जिल्हा अंधारात आहे. यात प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याला सर्वाधीक फटका बसल्याचे चित्र आहे. त्याचे असे की, संततधार पावसामुळे माडगीवरून निघणारी ६६ केव्ही लाईन बंद पडली असून त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुका प्रभावीत झाला आहे. या लाईनवर असलेली सुमारे ५३ गावे वीज पुरवठ्या अभावी असून त्यामुळे १४ हजार ५०० ग्राहक अंधारात आहेत. तर ३३ केव्ही लाईनचे पाच फीडर बंद पडल्याने यावरील २८६ गावे व त्यातील सुमारे ४६ हजार ५०० ग्राहकांकडील वीज पुरवठा बंद पडला आहे. तसेच ११ केव्हीचे ३४ फीडर बंद पडले असून त्यावरील ४२१ गावे व त्यातील सुमारे ६३ हजार ५०० ग्राहक अंधारात आहेत. पावसाने केलेल्या कहराने मात्र जनजिवन प्रभावीत झाले असून झालेल्या तुटफूटची दुरूस्ती व वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता विभाग जोमाने कामावर लागला आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात अंधार गुडूप
By admin | Published: July 23, 2014 11:41 PM