गोंदिया : गावातील गल्लोगल्लीतील चिमुकल्या बालकांना शाळेचा ध्यास लावण्यासाठी अंगणवाडीत पाठविले जाते. परंतु, या चिमुकल्यांची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लहान मुलांची काळजी घेण्याबरोबर विविध प्रकारची कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सर्व माहिती अपडेट राहावी, यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला शासनाने मोबाइल दिला होता. परंतु, देण्यात आलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असल्याने ते चालत नाहीत. त्यांना कव्हरेज मिळत नाही. माहिती वेळेवर जात नाही, यामुळे त्रस्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी मिळालेले मोबाइल परत केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ८११ अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाइल परत केले आहेत. सर्वच अंगणवाडी सेविकांनी मोबाइल परत केल्यामुळे आता माहिती ऑफलाइन द्यावी लागत आहे.
..............................
कामाचा व्याप
अंगणवाडी सेविकांवर कामाचा मोठा व्याप आहे. बालकांची काळजी घेणे, त्यांच्या मनोरंजनातून त्यांना काही शिकविण्याची किमया करणे, त्यांना मध्यान्ह जेवण देणे, पोषण आहार घरापर्यंत पोहोचविणे, गर्भवती, चिमुकले, नवजात बालके यांची माहिती गोळा करणे, त्यांचे वजन घेणे, कुपोषित बालके, सामान्य बालके, तीव्र कमी वजनाची, कमी वजनाची बालके किती याची माहिती संकलित करणे, बालकांच्या लसीकरणासाठी मदत करणे अशी विविध कामे त्यांच्यावर आहेत.
............
जिल्ह्यात एकूण अंगणवाड्या- १८११
अंगणवाडी सेविका- १८०५
जणींनी केला मोबाइल परत- १८०५
............
म्हणून केला मोबाइल परत
१) मोबाइलला कव्हरेज राहत नसल्यामुळे त्यातून माहिती पुढे जात नव्हती. माहिती पाठविण्यात अडचण येत होती.
२) मोबाइल ॲपमधून पाठविण्यात येणारी माहिती इंग्रजीतून भरावी लागत असल्याने ज्या अंगणवाडी सेविका ८ वीच्या शिक्षणावर भरती झाल्या त्यांचीही मोठी अडचण होती.
३) रेकॉर्ड लिहिणे त्यानंतर मोबाइलवर पुन्हा तीच माहिती भरणे, एकच काम दोन वेळा करावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना कंटाळा येत होता.
........................
मोबाइल विनाकामाचा
१) मोबाइलला कव्हरेज नाही, त्यात टाकलेली माहिती पोस्ट करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. गोळा केलेली माहिती रजिस्टरवर भरणे आणि पुन्हा तीच मोबाइलमध्ये टाकणे, एकच काम दोन वेळा करावे लागत असल्याने आम्ही तो मोबाइल परत केला आहे.
- यशोदा हुकरे, अंगणवाडी सेविका, पदमपूर
.............
२) माहिती मोबाइल ॲपमध्ये टाकायला बराच वेळ जात होता. वेळ घालवूनही माहिती ॲपमध्ये टाकले तरी ती माहिती कव्हरेजअभावी पुढे जात नव्हती. माहिती पाठविण्याच्या नादात बराच वेळ वाया जात हाेता. यामुळे सर्व अंगणवाडी सेविका कंटाळलेल्या होत्या. त्यामुळे मोबाइल परत केले आहेत.
- शारदा विठ्ठले, अंगणवाडी सेविका, पोवारीटोला.
..........
कोट
माहिती पोहोचत नसल्याने कंटाळलेल्या अंगणवाडी सेविकांनी मोबाइल परत केला आहे. आता ऑफलाइन माहिती पाठविली जात आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी मोबाइल प्रकल्प कार्यालयाकडे परत केला आहे.
- संजय गणवीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण, जि. प. गोंदिया.