गोंदिया : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह विविध मागण्यांना घेऊन राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २४) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मोर्चात सहभागी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार नारेबाजी करीत त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
फुलचूर चौकातून शुक्रवारी दुपारी एक वाजता मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. जिल्हा परिषदेसमोर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चात सहभागी सर्व अंगणवाडी सेविकांनी जोरदार नारेबाजी करून त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शकुंतला फटिंग, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, पोर्णिमा चुटे, विठा पवार यांच्या नेतृत्वात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा द्यावा ही ४६ व्या आयएलओची शिफारस अंमलात आणावी, दरमहा २१००० किमान वेतन द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.व पी.एफ.चे लाभ लागू करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सेवामुक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवामुक्ती दिली असलेल्या पगाराच्या निम्मे पेन्शन देण्यात यावे, मूलभूत सेवेचे खासगीकरण करण्याचे प्रस्ताव रद्द करावे जसे की अंगणवाडी,आरोग्य, शिक्षण, कर्मचाऱ्यांना ड्युटी करत असताना कुठल्याही कारणामुळे मृत्यू आल्यास ५० लाखांचे विमा कवच द्यावे, सर्व कामगारविरोधी लेबर कोड रद्द करावी व स्कीम कर्मचाऱ्यांना कामगाराच्या व्याख्येत समाविष्ट करावे, मानधनात कपात करण्यात येऊ नये, पोषण ट्रेकर मराठी भाषेत करण्यात यावे आणि निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत घेण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्चाचे नेतृत्व राजलक्ष्मी हरिणखेडे, वीणा गौतम, बिरजुला तिडके, सुनीता मलगाम, अनिता शिवणकर, कांचन शहारे, पुष्पलता भगत, शामकला मसराम, संगीता जनबंधू, पुष्पा ठाकुर, अंजना ठाकरे, दुर्गा संतापे, अर्चना मेश्राम, लालेश्वरी शरणागत, ज्योती लिल्हारे, लता बोरकर, देवागना अंबुले यांनी केले.