गोंदिया : बालकांना प्राथमिक स्तरावर करण्यात येणारे लसीकरण, देण्यात येणारा पोषण आहार आणि इतर आरोग्यविषयक सुविधेमुळे बालके निरोगी आयुष्य जगू शकतात. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अंगणवाडीची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी केले.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येणाऱ्या बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटक म्हणून डॉ.सैनी बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजीव दोडके, बाल आरोग्य अभियानाचे संयोजक डॉ.सुरेश लाटणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुरकर उपस्थित होते.डॉ.सैनी पुढे म्हणाले, बाल आरोग्य अभियान हे फक्त आरोग्य विभागापुरते मर्यादित नसून महिला व बाल कल्याण विभागाने आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे. बालकांमध्ये कुपोषणाप्रमाणे अतिपोषणाची समस्याही भेडसावत आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आरोग्य विभागाने सामाजिक सेवा संस्थानांदेखील सहभागी करुन घ्यावे. बालकांची आरोग्यविषयक अचूक नोंदणी करण्याचे यावेळी सांगितले.१२ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांतील अतिताणाचे प्रमाण बघता शाळा व महाविद्यालयस्तरावर समस्या निराकारण शाळेचे आयोजन करावे, असेही त्यांनी सुचविले. जिल्ह्यातील २५०-३०० बालके गंभीर आजारी असून या अभियानांतर्गत त्यांच्यावर उपचार करण्यात यावे, असे सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते म्हणाले, गोंदियासारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव आढळतो. परंतु अशा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती होते. यावेळी डॉ.हरिष कळमकर, डॉ.संजीव दोडके यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुरेश लाटणे, संचालन डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी तर आभार डॉ.दुधे यांनी मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व डॉ.बाहेकर नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)
बालकांच्या आरोग्यासाठी अंगणवाड्या महत्त्वाच्या-सैनी
By admin | Published: April 09, 2015 1:03 AM