गोरेगाव : कुठलेही प्रशिक्षण न देता अंगणवाडीसेविकांना मोबाइल देऊन त्यात इंग्रजीत माहिती भरणे अनिवार्य केले आहे. माेबाइलदेखील बरोबर चालत नसून त्याच्या दुरुस्तीसाठी अंगणवाडीसेविकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर वेळेत माहिती भरली नाही म्हणून त्यांचा पगार कपात केला जात आहे. या विरोधात मंगळवारी (दि. २४) अंगणवाडीसेविकांनी येथील बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून मोबाइल परत केले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन आयटक गोरेगाव तालुकाद्वारे मंगळवारी मोर्चा काढून मोबाइल वापस आंदोलन करण्यात आले. बालविकास विभागाने निकृष्ट दर्जाचे मोबाइल वाटप केल्याच्या घोषणा यावेळी दिल्या. तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी चव्हाण यांना देण्यात यावे. यावेळी सर्व अंगणवाडीसेविकांनी मोबाइल वापस केले. मोर्चाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, राज्य उपाध्यक्ष वीणा गौतम, जिल्हा उपाध्यक्ष पुष्पा ठाकूर, तालुकाध्यक्ष अंजना ठाकरे, तालुका सचिव भुमेश्वरी रहांगडाले, निवृत्ती मेश्राम, उपाध्यक्ष यशोदा पटले, कार्याध्यक्ष लक्ष्मी फरदे, आयटकचे चरणदास भावे, रत्नमाला गेडाम, लता तुरकर, ओमेशवरी हरिणखेडे यांनी केले. यात तालुक्यातील अंगणवाडीसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.