आमगाव : नगर परिषद अंतर्गत बनगाव येथील कॅनल रोड अनिहा नगर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी डबक्यात बसून आंदोलन करण्याचे लेखी निवेदन अनिहा नगरवासीयांनी नगर परिषदेला दिले आहे. अन्यथा २४ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बनगाव येथील कॅनल रोड अनिहा नगर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून जागोजागी डबकी तयार झाल्यामुळे दररोज अपघात घडून येतात. या रस्त्यावर कित्येक वाहन चालकांना दुखापत झाली असून चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. रस्ता बाघ सिंचन विभागाच्या कालव्यावर असून येथे जड वाहतुकीला बंदी आहे. परंतु तरीही टिप्पर, रेती- गिट्टीचे ट्रॅक्टर तसेच छतीसगड-मध्यप्रदेश येथील वाहने रात्रं-दिवस येथून धावतात. यामुळे या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या संदर्भात अनेकदा नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असून वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने नागरिक अपघाताला नाहक बळी पडतात. येथील रस्त्यावरील डबक्यात पहाडी मलमा किंवा मुरूम टाकण्यात यावेत जेणेकरून नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होणार नाही. खड्डे बुजविण्यात आले नाही तर तेथील तलावस्वरूपी डबक्यात बसून बेमुदत आंदोलनाचा इशारा नगर परिषदेला राजीव फुंडे, डॉ. आर्य भूषण, विद्यालाल रहांगडाले, बुधराम हत्तीमारे, से.नि.प्राचार्य बी. एम. कटरे, डॉ. महेश मल, नरेंद्र बहेटवार, प्रसाद बावनथडे, जी. के. दसरिया, निखिल टेंभरे, जागेश्वरी येळे, वेगेंद्र बीसेन, एस. टी. गोंडाणे, संजय रावत, श्यामसुंदर बिसेन, गुड्डू पवार यांनी दिला आहे.