सालेकसा : सालेकसा तालुका मुख्यालयाच्या परिसरात अनेक ठिकाणी नळाला जंतुयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सालेकसा येथील एका घरी नळाच्या पाण्यातून नारूसदृश जंतू निघाला आहे. त्यामुळे परिसरात लोकांमध्ये रोग पसरण्याची भिती वाढली आहे. मात्र आरोग्य विभाग झोपेतच आहे असे दिसून येत आहे. तसेच नगर पंचायत आणि ग्रामपंचायत किती दक्ष आहे. याबाबत सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे.पावसाळ्यात पाण्यामुळे आणि डासांमुळे अनेक रोग पसरण्याची शक्यता असते. अशात पावसाळा लागण्यापूर्वी आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क राहून परिस्थितीला तोंड देणे आवश्यक असते. तसेच पाण्यामुळे व डासांमुळे रोगाची लागण होऊ नये यासाठी पूर्व दक्षता घेणे आवश्यक असते. परंतु सध्या सालेकसा परिसरात जंतूयुक्त पाणी नळाला येत असल्याचे पाहून यात समन्वय साधून परिस्थितीला तोंड देण्याची कमतरता जाणवत आहे.सालेकसा मुख्यालय हे आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये असून तहसील कार्यालय नंतरचा बाहेरचा भाग सालेकसा नगरपंचायतमध्ये येतो. आणि या दोन्ही परिसरात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरोग्य विभागासह आमगाव खुर्द ग्राम पंचायत तसेच सालेकसा नगर पंचायत यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सालेकसा येथे नगर पंचायत अजून अस्तित्वात आली नसून प्रशासकाच्या माध्यमातून कारभार चालविला जात आहे. त्यामुळे परिसरात प्रत्येक ठिकाणी कोण कोणत्या समस्या उद्भवत असतात याकडे विशेष लक्ष देण्यात येत नाही. हा सर्व असला तरी सामान्य जनतेला पिण्याचे पाणी शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. प्रशासनाने दखल घेणे गरजेचे झाले आहे.
सालेकसा परिसरात जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा
By admin | Published: August 26, 2016 1:30 AM