गोंदिया : शनिवारपासून (दि.१६) सुरूवात झालेल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेंतर्गत आता मंगळवारी (दि.१९) जिल्ह्यातील आणखी ३०० फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सचे लसीकरण केले जाणार आहे. नियोजित ३ केंद्रांवरच हे लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ८४२८ फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सलाच लसीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.
सन २०२० ला झपाटून घेतलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतातच २ लस विकसित करण्यात आल्या आहेत. या लसींना भारत सरकारने मंजुरी दिल्यानंतर शनिवारी (दि.१६) अवघ्या देशात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ३०० कोरोना वॉरियर्सला लस देण्याचे ठरविण्यात आले होते. यासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालय, देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या शुभारंभ दिनी ३०० कोरोना वॉरियर्सला लस देण्याचे नियोजन होते तरीही २१३ वॉरियर्सचेच लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता मात्र मंगळवारी (दि.१९) लसीकरण मोहीम चालविली जाणार असून यंदा ३०० कोरोना वॉरियर्सला लस दिली जाणार आहे. यासाठी ठरवून देण्यात आलेल्या त्याच ३ केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या नियोजनानुसार अन्य नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.
--------------------------
मंगळवार, गुरूवार आणि शनिवारीच कोरोना लसीकरण
शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहिमेला शुभारंभ झाला आहे. त्यानंतर आता ही लसीकरण मोहीम नियमितपणे चालविली जाणार आहे. मात्र यासाठी आठवड्यातील ३ दिवस ठरवून घेण्यात आले आहेत. यात मंगळवार, गुरूवार व शनिवारीच कोरोना लसीकरण केले जाईल. सोमवार, बुधवार व शुक्रवारी जिल्ह्यात लहान बाळांच्या लसीकरणाचा कार्यक्रम नियोजित आहे.
------------------------------
उर्वरित ८७ वॉरियर्स आता सर्वात शेवटी
शनिवारी २१३ वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आल्याने ८७ वॉरियर्सचे लसीकरण झाले नव्हते. आता मात्र या ८७ वॉरियर्सचे लसीकरण सर्वात शेवटी म्हणजेच, ८४२८ कोरोना वॉरियर्सचे लसीकरण केले जात असताना त्यांच्यात शेवटी होणार आहे. या ८७ वॉरियर्सचे लसीकरण झाल्यानंतरच अन्य नागरिकांसाठी पुढील टप्पा ठरविला जाईल.
-------------------------
जिल्हा राज्यात ७ व्या क्रमांकावर
शनिवारी जिल्ह्यात २१३ वॉरियर्सचे लसीकरण करण्यात आले व त्याची ७० एवढी टक्केवारी होती. त्यानुसार गोंदिया जिल्हा लसीकरणात राज्यात ७ व्या क्रमांकावर होता. नियमितपणे आता लसीकरण होणार असल्याने लवकरच कोरोनाला देशातून मूठमाती देता येईल असा विश्वास बाळगायला हरकत नाही.
-------------------------
मनात शंका बाळगू नका
शनिवारपासून जिल्ह्यात लसीकरणाला यशस्वीपणे सुरुवात झाली आहे. लस घेणारे कोरोना वॉरियर्स स्वस्थ असल्याने लसीबाबत कुणीही आपल्या मनात शंका बाळगू नये. कोरोनाला संपविण्यासाठी शासनाच्या या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. संजय पांचाळ
नोडल ऑफिसर