लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी तसेच महिलांना धीर देण्यासाठी शासनाकडून महिला तक्रार निवारणासाठी ‘भरोसा सेल’ उघडण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे पहिले ‘भरोसा सेल’ उघडण्यात आले तर दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात २३ जून रोजी उघडण्यात आले. या भरोसा सेल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला.पाहुणे म्हणून जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे व पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी, न्यायालयाच्या ताब्यात असलेली जमीन पोलीस विभागाला मिळावी यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी न्यायाधीशांचे मिळालेले सहकार्य याची माहिती दिली. जयस्तंभ चौकातील वाहतूक शाखेच्या बाजूला उपविभागीय कार्यालय, ‘भरोसा सेल’ व वाहतूक शाखा या तिघांसाठी पाच माळ्याची इमारत तयार केली जाणार आहे, असेही सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, सदर जागेसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी काम केले. हे काम अंतिम टप्प्यात असताना एक सभा घेऊन याला मूर्त रूप देण्यात आल्याचे सांगीतले. नीता ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’चे काय महत्व आहे, ते पटवून दिले. अन्यायग्रस्त महिला पोलीस ठाण्यात आल्यास त्यांना माहेरी मिळते तसे वातावरण मिळावे, असे सांगितले.जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी, महिलांना सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महिलांवर अन्याय झाल्यास त्या अन्यायासाठी भरोसा सेल चांगली मदत करू शकेल, असे सांगितले.कोनशिलाचे लोकार्पण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री बडोले यांनी, गोंदिया जिल्ह्यातील गुन्हेगारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आधीच्या गुन्ह्यासंदर्भात गोंदियाचे वातावरण व आताचे वातावरण यात बरीच तफावत आहे. संपूर्ण गुन्हेगारी कमी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीवर वचक बसला असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका कोकाटे यांनी केले. आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले. या वेळी सामाजिक कार्यकर्ता बोस यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी महिलांच्या सुरक्षेला घेऊन प्रश्न विचारले.कार्यक्रमासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोहर दाभाडे, गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार नारनवरे, सहायक पोलीस निरीक्षक चौरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी सहकार्य केले.
संरक्षणासाठी राज्यातील दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:08 PM
महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी तसेच महिलांना धीर देण्यासाठी शासनाकडून महिला तक्रार निवारणासाठी ‘भरोसा सेल’ उघडण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे पहिले ‘भरोसा सेल’ उघडण्यात आले तर दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात २३ जून रोजी उघडण्यात आले.
ठळक मुद्देशासकीय इमारतीचा कोनशिला समारंभ : जयस्तंभ चौकात होणार पाच माळ्याची इमारत