नितीन राऊत : काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले आवाहन
गोंदिया : गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे खरे रूप नागरिकांनी पाहीले आहे. प्रत्येक बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी केले. क्रांती दिवसाचे औचित्य साधून येथील प्रताप लॉनमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून आ.गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे, तिरोडा विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, आमगाव विभानसभा प्रभारी माजी आ.पेंटाराम तलांडी आदी होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज ज्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा दुनियेत गौरव करीत फिरत आहे ती टेक्नॉलॉजी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची देण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गौरवशाली वाटा आहे. ज्या देशात स्वातंत्र्यानंतर सुई बनविण्याचा कारखानाही नव्हता त्या देशाला काँग्रेसच्या नेतृत्वात सशक्त बनविले. स्व.इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पोखरण येथे अनुचाचणी करण्यात आली. सोनिया गांधींच्या नेतृत्वात १० वर्षे राज्य करताना पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरणाची दारे उघडली. यातूनच अनेक क्रांतीकारी योजना सुरू झाल्या. मात्र आजचे सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य आधारभूत किंमत देण्यातही यशस्वी झाले नाही. महागाई थांबविण्याचे आश्वासन देणाऱ्यांच्या काळात महागाई अजून वाढतच असून हे सरकार केवळ खोटी आश्वासनेच देऊ शकतात, अशी टीका डॉ.राऊत यांनी केली. आ.गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिन विकास ही माझी प्राथमिकता आहे. राजकारणात उच्च आदर्श ठेवत आपण कधीही विकास कामात पक्षपातीपणा केला नाही. २००४ पासून आजपर्यंत गोंदिया विधानसभेचे नेतृत्व करताना काँग्रेसला मजबूत करण्याचे काम केले. आज क्रांती दिवसाच्या पर्वावर येणाऱ्या आव्हानांचा सामना पूर्ण ताकदीनिशी करून गोंदिया नगर परिषद तसेच इतर स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी इतर पाहुण्यांसह माजी मंत्री भरत बहेकार, माजी जि.प.अध्यक्ष अॅड.के.आर.शेंडे, टोलसिंहभाऊ पवार, रजनी नागपुरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा सहारे, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेसराव कोरोटे, अनिल गौतम यांनीही मार्गदर्शन केले. सर्व कार्यकर्त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांपासून प्रेरणा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन माजी आ.रामरतन राऊत यांनी केले. यावेळी सर्व अतिथींनी वरिष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व माजी मंत्री केवलचंद जैन यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोरेगाव नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशिष बारेवार, न.पं.सदस्य चंद्ररेखा कांबळे, सातगावचे उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, भडंगाचे उपसरपंच वामन नंदेश्वर, गोरेगाव नगर पंचायत चे सभापती राजू टेंभुर्णीकर, सदस्य श्यामली जैसवाल, तसेच नागेश दुबे, राजेश कापसे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, एनएसयुआयचे जिल्हा अध्यक्ष संदीप रहांगडाले, सभापती स्रेहा गौतम, हेमलता डोये, पौर्णिमा शहारे,सीमा कटरे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)