चाहुल खरीप हंगामाची : कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यालोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो. शेणखात शेतावर नेवून टाकणे, बियाण्यांची देवाण-घेवाण करणे, जमिनीची सफाई, मशागत करणे इत्यादी कामे करीत असते. त्याबरोबर शेतीची अवजारे नांगर, वखर, बैलबंडी, दुरुस्ती करणे किंवा नवीन बनविण्याचे काम करतो व शेतीच्या कामाला लागतो. मृग नक्षत्र लागताच पेरणीला सुरुवात करतो. ज्या शेतकऱ्यांची शेती आधीपासून नागरणी केलेली असते, ते शेतकरी पेरणीला आधीपासून सुरुवात करतात. मात्र ज्यांचे शेत नागरणी केलेले नसते त्याला दमदार पावसाची वाट बघावी लागते. परंतु यावर्षी उन्हाळी धानपीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नियोजन बदल होत आहे. मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून काही शेतकरी धानपेरणीच्या तयारीला लागले आहेत. तर काही शेतकरी पावसाची वाट बघू लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक टाकले होते, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांची कापणीसुद्धा बाकी आहे. त्यामुळे ते उन्हाळी धान पिकाची कापणी, मळणी व तणस व्यवस्थित करण्याच्या लगबगीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी स्वत: बोअरवेलच्या पाण्याचे उन्हाळी धानपीक लावले होते, त्यांची कामे आटोपली आहेत आणि ते पुढील खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. परंतु जे शेतकरी जलाशयाच्या पाण्याच्या भरवशावर धानपीक लावण्यासाठी अवलंबून होते, त्या शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. उन्हाळी धानपिकाचे काम लांबणीवर जाण्यामागे दुसरे कारण असे की, काही वर्षापूर्वी रबी पिकात तीन महिन्यांच्या कालावधीचे धानाचे वाण लावत होते. यात सी.आर.सव्वीस, कलिंगा यासारख्या वाणाच्या धानाचा समावेश होता. परंतु आता एम.टी.यु., एक हजार दहा सारखे १२० दिवसांच्या कालावधीचे वाणाचे धान लावले जातात. त्यामुळे मे महिन्यात होणारी कापणी जून महिन्यापर्यंत लांबते. यात एकीकडे रबी हंगामातील उन्हाळी धानपिकाची कामे आटोपण्याची लगबग तर दुसरीकडे खरीप हंगामाची कामे करण्याची घाई, यात शेतकरी गोंधळून जातात. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले नाही, त्यांची खरीप हंगामाच्या कामाबाबत आघाडी असते. अशा परिस्थितीत रोवणीचे कामसुद्धा मागे पुढे असतात. काही पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी लावल्याने खरीप हंगामातील पीक कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. ही तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना म्हणून ज्यावर्षी उन्हाळी धानपीक घेण्यात येते, त्यावर्षी जलाशयातील पाणी शेतकऱ्यांना एक महिन्यापूर्वी सामान्यत: डिसेंबर महिन्यात पुरविले पाहिजे. तसेच कृषी विभागाने ९० ते १०० दिवसांच्या कालावधीच्या धानाची वाण विकसीत केले पाहिजे, अशी मागणी होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून धानाची वाण तयार केल्यास शेतीचे काम यशस्वीपणे होवू शकतात.
कुणाला कामाची लगबग तर कुणाला पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: June 13, 2017 12:59 AM