खविसं निवडणूक : निवडणूक खर्चावरून वाद पेटणारअर्जुनी मोरगाव : स्थानिक खरेदी विक्री समितीची दुसऱ्यांदा निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी निवडणुकीसाठी एकदा खर्च झालेला आहे. ज्यांच्यामुळे परत ही निवडणूक होत आहे त्यांचेकडून अथवा सहकार न्यायाधिकरण निवडणूक विभागाकडून वसूल करण्यात यावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे निवेदन संचालक यशवंत परशुरामकर, विजयसिंह राठोड व नगरसेवक किशोर शहारे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील खरेदी विक्री समितीची निवडणूक १९ आॅगस्ट रोजी घेण्यात आली होती. निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील निधी ग्राह्य स्वीकारण्यात आलेल्या २० व्यक्तींचे ६२५ रुपयांचे भाग भांडवल नसल्याच्या कारणावरून नामनिर्देशन पत्र नामंजूर केले व विधीग्राह्य नामनिर्देशन यादीतील त्यांची नावे कमी करण्याची मागणी काही लोकांनी केली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती. याचिकेतील उत्तरार्थी क्रमांक ४२४ यांची वैध नामनिर्देशनपत्राच्या यादीतील नावे कमी करून निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश ६ आॅगस्ट रोजी पारित करण्यात आले. त्यानुसार संबंधित उत्तरार्थीची नावे वगळून १९ आॅगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. परंतु न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती. शेवटी २० आॅक्टोबर रोजी ही याचिका निकाली काढण्यात आली. त्यानुसार ६ आॅगस्ट पासूनची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून दोन महिन्याच्या अवधित नवीन निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश पारित करण्यात आले. उत्तरार्थी क्रमांक ४२४ यांचे नामनिर्देशन पत्र कायम ठेवून २२ जुलैच्या जुन्या उमेदवारांची यादी कायम केलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात याचिकाकर्त्यांवर २५ हजारांचा दंड, खर्च ठोठावला. उच्च न्यायालयाचा आदेशामुळे २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या उमेदवारांचा यादीप्रमाणेच पुढील प्रक्रिया पार पाडून घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २० डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यासाठी नव्याने कार्यक्रम घोषित केला. मात्र या निवडणुकीचा खर्च खरेदी विक्री समितीवर लादण्यात येऊ नये, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
- तर न्यायालयात दाद मागणार
By admin | Published: November 28, 2015 2:52 AM