प्रकाश मेश्राम : उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान लोकमत न्यूज नेटवर्क देवरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाडाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी उत्पन्न वाढीच्या सूत्राचा वापर करून आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ करावी, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मेश्राम यांनी केले. लगतच्या चिचेवाडा येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात उन्नत शेती समृध्द शेतकरी या उपक्रमाची माहिती देताना ते बोलत होते. देवरी मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात या सभेचे आयोजन करण्यात आले. देवरी मंडळ क्षेत्रातील चिचेवाडा, आमगाव, सरेपार, जमनापुर, पुराडा, मुरपार येथील सभेत उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे सूत्र, कृषी विभागांतर्गत शेती विकासाच्या तसेच शेतकरी व्यवसायाच्या विविध योजना, शासनाच्या उन्नत शेती-समृध्द शेतकरी या अभियानाचे महत्व आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत तालुक्यातील या अभियानाच्या सभेत माती परीक्षण, बीज प्रक्रिया, श्री पध्दत, चारसूत्री पध्दत, कृषी अभियांत्रिकीकरण, फळबाग लागवड, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. देवरी मंडळांतर्गत सुरू असणाऱ्या या अभियानामध्ये कृषी सहायक लेमन गोमासे, प्रशांत सावलकर, रजनीश पंचभाई, भारत डोंगरवार, संजय कापगते, गणेश तिडके, मनोहर कोल्हे, देवेंद्र हरदुले, ईश्वर पाथोडे, ललीता धानगाये आदी सहकार्य करीत आहेत. सभांना उपस्थित राहण्याचे आवाहन आहे.
उत्पन्न वाढीच्या सूत्राचा अवलंब करा
By admin | Published: May 31, 2017 1:16 AM