गोंदिया : मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणानुसार शैक्षणिक व शासकीय तसेच निमशासकीय सेवेत सरळ आरक्षण लागू करावे अशी मागणी येथील श्री शिवछत्रपती मराठा समाज संघटनेने केली आहे. आपल्या मागणीसाठी समाजाच्यावतीने नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय सीबीसी-१०/२०१३/प्र.क्रं.३५/मावक दिनांक १५ जुलै २०१४ नुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यानुसार शिक्षण व शासकीय सेवेत सुद्धा मराठा समाजाला आरक्षण लागू राहणार आहे. करिता शासन निर्णयानुसार मराठा समाजातील शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार सवलती प्रदान करण्यात याव्यात. तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत स्थानिक मराठा समाजाला प्राधान्य देण्यात यावे. याचप्रकारे, शिक्षण क्षेत्रातील उच्च, तंत्र शिक्षण, वैद्यकीय, कृषी व पशु वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मराठा समाजातील युवकांना सवलती देण्यात याव्या. शिवाय जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात याव्या अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. या मागणीसाठी समाजाने निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतान मराठा समाजाचे अध्यक्ष अशोक इंगळे, सचिव दीपक कदम, विजय सावंत, अमृत इंगळे, महेंद्र तुपकर, तानाजी डावकरे, आशिष जुनघरे, राजू इंगळे, दिगंबर लोहकरे, अनिल काळे, राजेंद्र जगताप, स्वप्नील भापकर, विवेक जगताप, निखिलेश लिमसे, अशोक शिंदे, संजय सोनाने व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
मराठा समाजाला आरक्षण लागू करा
By admin | Published: August 19, 2014 11:48 PM