कपिल केकत
गोंदिया : कोरोनामुळे कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला असून, कित्येकांवर दोन वेळच्या जेवणाचे संकट उभे असतानाही शाळांकडून मात्र माणुसकी न दाखविता फीवाढ व फीसाठी तगादा लावला जात आहे. मागील वर्षीही शाळांनी नाममात्र फी कमी करून पालकांकडून बाकीचे पैसे उकळून घेतले. तोच प्रकार यंदाही होत असून, पुस्तकांसाठी पालकांना फोन करणे सुरू झाले असून, काही दिवसांनी फीसाठी फोन करण्यास सुरुवात होईल. कोरोनाच्या कठीण समयीही शाळांकडून काहीच दयाभाव न दाखविता पैसे कमाविण्याचा कारभार सुरू आहेत. त्यात शिक्षण विभागातील २० पैकी १६ पदे रिक्त आहेत. अशात आता पालकांनी तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न पडला आहे.
--------------------------
उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारींची जबाबदारी
कोरोनाकाळात शिक्षण विभागाकडे पाच तक्रारी आल्या आहेत. त्यात तीन तक्रारी शिक्षण शुल्काबाबत असून दाेन तक्रारी शिक्षकांच्या वेतनाला घेऊन आहेत. या पाचही तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, आता विभागाकडे एकही तक्रार पेंडिंग नाही.
--------------------------------
पालक म्हणतात, तक्रार करायची कोठे
कोरोनाकाळात शाळा बंद असून मुले एक दिवसही शाळेत गेले नाहीत. तरीही शाळांकडून फीसाठी तगादा लावला जातो. मागील वर्षी तसेच झाले व अखेर मोजकी सूट देऊन शाळांनी बाकीची फी वसूल केली. यंदाही तोच प्रकार घडणार आहे. यावर पक्की कारवाई होणार यासाठी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न पडतो.
- माया शिवणकर (पालक)
--------------------
आज शिक्षण एवढे महागडे झाले आहे की, ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तरीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पालक काटकसर करीत आहेत. मात्र कोरोनामुळे पाल्य शाळेत गेले नसतानाही शाळांकडून फी घेतली जात आहे, हे चुकीचे आहे. मागील वर्षी तसेच झाले, आताही तसेच होणार आहे. मात्र तक्रार करायची कुणाकडे हेच समजत नाही.
छाया नागपूरे (पालक)
-----------------------------
संघटना पदाधिकारी कोट
जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभारच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. अशात शिक्षकांच्या तक्रारी आम्ही प्रभारी अधिकाऱ्यांकडे मांडतो. मात्र ते आमच्या समस्यांचे पूर्ण ताकदीने निराकरण करीत नाहीत. यामुळे आमच्या कित्येक तक्रारी प्रलंबित पडून आहेत. कायम अधिकारी येत नाहीत तोपर्यंत यावर काहीच तोडगा नाही.
- एस. यू. वंजारी, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
-----------------------------
जिल्ह्यातील रिक्त पदांमुळे सर्व कारभार प्रभारींच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. यामुळे तक्रार करूनही त्यांच्याकडून वेळेवर काम होत नसल्याने तक्रारी प्रलंबित आहेत. कायम अधिकारी येत नाही तोपर्यंत हीच स्थिती राहणार असून, यासाठी पदभरती करणे गरजेचे आहे.
-किशोर बावनकर
तालुका सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
------------------------------
१) जिल्ह्यातील शाळा -११४१
शासकीय शाळा - १०६९
अनुदानित शाळा -६१
विनाअनुदानित शाळा - ११
२) शिक्षण विभागात रिक्त पदे वाढली
एकूण पदे रिक्त पदे
शिक्षणधिकारी - ०१ ०१
गट शिक्षणाधिकारी - ०८ ०७
उपशिक्षणाधिकारी - ०३ ०३
अधीक्षक (शालेय पोषण आहार) ०७ ०४
लेखाधिकारी ०१ ०१