गोंदिया : शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयक लवकरात लवकर काढून देण्यात यावे, यासाठी येथील शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि. १६) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची खूप दिवसांपासून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके जिल्हा परिषदेत प्रलंबित आहेत. याविषयी शिक्षकांनी शिक्षण विभागात अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु शिक्षण विभागामार्फत देयक पास झाल्यानंतर आरोग्य विभागात अनेक दिवस पडून राहात असल्याचे निदर्शनास आले. यावर शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कापसे यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली व निवेदन देण्यात आले. डॉ. कापसे यांनी लवकरात लवकर देयक मंजूर करण्याचे आश्वासन दिले. चर्चेला संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवी अंबुले, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम, कार्याध्यक्ष प्रमोद शहारे, कार्याध्यक्ष वाढई उपस्थित होते.