देवरी : आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान खरेदी केली जाते. परंतु एका-एका धान खरेदी केंद्राना २५ ते ३० गाव जोडली असल्याने वेळेवर शेतकऱ्यांचे धान खरेदी केली जात नाही. परिणामी धान नाईलाजास्तव व्यापाऱ्याला विकावा लागतो. यात त्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. याकरीता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये धान खरेदी संस्थेला मंजुरी द्यावी अशी मागणी आ. सहषराम कोरोटे यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली.
आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्रात देवरी, आमगाव व सालेकसा असे तीन तालुका आहेत. या तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धान खरेदी संस्थेमार्फत शेतकऱ्यांचे धान खरेदी केली जाते. खरेदी संस्थेला २५ ते ३० गावांचा समावेश असल्याने व या क्षेत्रात मोजके धान खरेदी संस्था असल्याने शेतकऱ्यांची बरेचदा अडचण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान वेळेवर खरेदी केले जात नाही. अशा परिस्थितीत त्यांचे धान घरीच पडून राहते मग त्यांना नाईलाजास्तव कमी किंमतीत आपले धान व्यापाऱ्याला विकावा लागते. यात त्यांचे आर्थिक नुकसान होते, अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. यासंदर्भात मी गोंदियाचे पणन अधिकारी यांना अनेकवेळा तक्रारी केल्या तरीही यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला धान खरेदी संस्था देऊन त्या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरु केल्यास कोणत्याही प्रकारची धान खरेदी केंद्र सुरु केल्यास कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही व शेतकऱ्यांचे धान वेळेवर खरेदी केली जाईल. त्यामुळे या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी कोरोटे यांनी निवेदनातून केली.