अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुक्याने आपले महसूल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्केपेक्षा जास्त साध्य करून या महामारीच्या कठीण प्रसंगात शासनाच्या तिजोरीला हातभार लावला आहे. यामुळेच महसूल वसुलीत अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असूनही अगदी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत महसूल वसुलीचे लक्षांक जास्त असूनसुद्धा लॉकडाऊन काळात आर्थिक वर्षाचे जवळपास ८-९ महिने वाया गेले. असे असतानाही अर्जुनी-मोरगाव तालुक्याने आपले महसूल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्केपेक्षा जास्त साध्य करून या महामारीच्या कठीण प्रसंगात शासनाच्या तिजोरीला हातभार लावला आहे. गौण खनिज विषयक पत्र (ब)चे उद्दिष्ट २ कोटींपेक्षा जास्त असताना आणि तालुक्यातील एकही वाळू घाट लिलावासाठी प्रस्तावित नाही. असे असतानाही अवैध गौण खनिजाचे खनन आणि वाहतूक प्रकरणात दंडात्मक कारवाई करून तेसुद्धा उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करताना अर्जुनी-मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार, सर्व क्षेत्रिय अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे भरपूर सहकार्य मिळाले, अशी प्रतिक्रिया तहसीलदार मेश्राम यांनी व्यक्त केली. पुढील काळातसुद्धा अर्जुनी-मोरगाव महसूल विभाग यशस्वी कामगिरी करेल तसेच सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.