प्रत्यक्षात मद्यपी शिक्षक जास्त : व्यसनमुक्त केंद्रात पाठविण्याचा सल्ला बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनातील १३८ शाळामधून उद्याचे उज्वल भावी नागरिक घडविण्याचे कार्य गेल्या कित्येक वर्षापासून अविरत सुरू आहे. आजघडीला जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावत आहे. बालवयातील मुलांना वाईट सवयींचा स्पर्श होत आहे. गुरूच्या ठिकाणी असलेले शिक्षक व्यसनाधिनतेच्या आहारी जात असल्याचे दिसते. शाळेमध्ये शिक्षकांचे असे कृत्य पाहून बालवयातील विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. मद्यपी शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाने मद्यपी शिक्षकांची शोध मोहीम हाती घेतली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनातील ६ शिक्षक मद्यपी असून त्यांना व्यसनमुक्त केंद्रात पाठविण्याचा सल्ला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी वरिष्ठांना दिल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषद गोंदियाचे शिक्षणाधिकारी यांनी ५ डिसेंबर २०१५ च्या एका पत्रान्वये मद्यपी शिक्षकांची माहिती जिल्ह्यातील सर्व पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्याकडून मागीतली होती. त्या अनुषंगाने अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी २८ डिसेंबर २०१५ रोजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ६ शिक्षकांची माहिती पाठवून व्यसनाधिन असलेल्या या ६ शिक्षकांना व्यसनमुक्त करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचा सल्ला देण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. भावी पिढी घडविणाऱ्या व्यसनाधिन शिक्षकांना जरब बसविणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना टिकण्यासाठी बालपणापासून दर्जेदार शिक्षणासह सुसंस्कृत संस्काराची गरज आहे. परंतु सध्या जिल्हा परिषद शाळांमधून असे उपक्रम राबविले जाताना दिसत नाही. सर्वसामान्यांचे मुले शिक्षण घेत असलेल्या जि.प.शाळाची वाताहात झालेली दिसत आहे. तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोरी, मुंगली, घुसोबाटोला, झाशीनगर, अर्जुनी-मोरगाव क्रं. १, इसापूर या शाळेतील ६ मद्यपी शिक्षक असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. जि.प.चे १३५ प्राथमिक शाळा व ३ हायस्कूल कार्यान्वीत आहेत. पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्यानी फक्त ६ शिक्षकच मद्यपी असल्याचे वरिष्ठांना कळविले आहे. खरोखर चौकशी केली तर हा आकडा शतकी गाठू शकतो. शाळेतील शिक्षक हा व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जि.प.फक्त सहा शिक्षक मद्यपी ?
By admin | Published: January 24, 2016 1:47 AM