गोंदिया : जागृती सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित मुंडीकोटा येथील संचालक मंडळ व कर्मचारी यांनी संगनमताने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ६ हजार खातेदारांचे ४२ कोटी रुपये बुडीत निघाले आहेत. या संस्थेविरूद्धच्या खातेदारांनी केलेल्या
तक्रारीमुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी चौकशी व २०१५-२०१९ या आर्थिक वर्षाचे फेर लेखापरीक्षणाचे आदेश दिले. लेखाधिकारी सहकारी संस्था गोंदिया वर्ग १ यांनी केलेल्या फेर परीक्षणात ३ कोटी ३० लाख ७१ हजार रुपयांची अफरातफर व १५ कोटी ३२ लाख ४४ हजार ९१ रूपयांचा ठपका ठेवत १६ आजी माजी संचालक व १२ कर्मचारी यांच्याविरूद्ध दिनांक ३० डिसेंबर २०२० ला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
तिरोडा पोलिसांनी सर्व २८ आरोपींविरुद्ध भादंवी कलम ४०६,४०९,३४ व ४२० तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा सहकलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सद्यस्थितीत ह्या गुन्ह्याचा तपास तिरोडा पोलीस करीत आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र रहांगडाले यांना ३० डिसेंबर २०२० ला संस्था संचालक व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वीच तिरोडा पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेले असता त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना गोंदिया जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ते तेथे उपचार घेत आहेत. इतर २१ आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना अद्यापही अटक न झाल्याने खातेदारांमध्ये रोष व्याप्त आहे. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी. १६ संचालक व १२ कर्मचारी यांनी संगनमताने हा गुन्हा केला असून ६ हजार सामान्य खातेदारांचे जवळपास ४२ कोटी रुपये बुडविले आहेत. त्यांच्यावर इतर कलमां भादंवीच्या १२० कलम सुद्धा लावण्यात यावी. यासंबंधीचे निवेदन महिला खातेदारांनी शनिवारी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना दिले. शिष्टमंडळात प्रतिभा गायकवाड,रजनी पेलागडे, कल्पना डोमळे, कुसुम हटवार, शारदा उपरीकर, निशा पटले, माधुरी फटींग, सुनीता तिजारे, वर्षा शेंडे, दुर्गा शहारे यांचा समावेश होता.
......
४७ दिवसात केवळ पाच आरोपींना अटक
मागील ४७ दिवसात केवळ ५ आरोपींना पोलीस अटक झाली आहे. यात संस्था अध्यक्ष भाऊराव नागमोती, संचालक भोगेलाल बोहने, लिलाधर बांते, नंदा सेलोकर व कर्मचारी निखिल मेश्राम यात यांचा समावेश आहे.१ तज्ज्ञ संचालक अंतरिम जामिनावर बाहेर आहेत.
.......
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग का नाही?
वास्तविक ५० लाख रुपयांच्यावर रक्कम असलेला आर्थिक गुन्ह्याचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हा शाखा करते, परंतु या प्रकरणात हा गुन्हा आर्थिक शाखेकडे अद्याप वर्ग केला नाही. तिरोडा पोलीस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपास कार्य संथगतीने सुरू असल्याने खातेधारांमध्ये रोष व्याप्त आहे.