लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई दादर येथील राजगृह निवासस्थानावर मंगळवारी (दि.७) अज्ञात इसमानी नासधूस केली. तसेच घराच्या काचा आणि कुंड्यांची सुध्दा तोडफोड केली आहे. या घटनेचा संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल,विविध बुद्ध विहार संघटना व सर्वसमाज जयंती समितीने बुधवारी तीव्र शब्दात निषेध नोेंदविला आहे. तसेच या घटनेतील आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेट देतात. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही माथेफिरुनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्या अज्ञात इसमांनी घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान केले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. राजगृह येथे झालेला प्रकार माथेफीरूने केला असून याचा पोलीस तपास करीत आहेत. या सर्व प्रकाराचा निषेध करुन या प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी. तसेच ऐतिहासिक धरोहर असलेल्या राजगृहाची सुरक्षितता व चोख बंदोबस्ताची मागणी संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, विविध बुद्ध विहार संघटना व सर्वसमाज जयंती समितीने केली आहे.भाकपने केला निषेधसंविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई दादर येथे असलेल्या राजगृह निवासस्थानावर मंगळवारी (दि.७) अज्ञात इसमानी नासधूस केली. तसेच तेथील काही वस्तूंची तोडफोड सुध्दा केली. या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष गोंदिया जिल्हा शाखेने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
राजगृहाची नासधूस करणाऱ्यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM