गोंदिया:
केमिकलमध्ये १० हजार रूपयांच्या नोटा ठेवल्यास अडीच लाख रूपये तयार होतात असे सांगून १० हजार रूपयाने फसविणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्या आरोपींना २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बालाघाट टी पॉइंट येथे अटक करण्यात आली.
पिंटूकुमार सुंदरलाल बारमाटे (३२) रा. ए-४६, मलाजखंड वाॅर्ड क्रमांक २०, जि. बालाघाट, दुर्गेश सिताराम मरसकोल्हे (३०) रा. बंजारीटोला, ता. बिरज, जि. बालाघाट, सियाराम महिपाल चौधरी (४२) रा. सतोना, ता.जि. गोंदिया, राजेश अमरलाल नेवारे (३०) रा. बालाघाट, विष्णू बाबुलाल पंधरे (४२) रा. पारगाव, ता. किरनापूर जि.बालाघाट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सतोना येथील दिपांशू ब्रिकचंद उरकुडे यांना आरोपींनी १० हजार रूपयाच्या नोटा एका केमिकलमध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटा मधून अडीच लाख रुपये तयार होतात असे सांगून त्यांच्याकडून १० हजार रूपये घेतले. एक केमिकल टाकलेले नोटाचे बंडल पॅक करून दिपांशू यांना दिले. दोन तासांनी उघडून बघायला सांगितले. उरकुडे यांनी याच्या जवळून १० हजार रूपये जप्त करण्यात आले. या आरोपींवर रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सरवदे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे, पोलीस हवालदार चित्तरंजन कोडापे, इंद्रजित बिसेन, पोलीस शिपाई संतोष केदार, महिला पोलीस शिपाई स्मिता तोंडरे यांनी केली आहे.
कार क्रमांकामुळे आला गुन्हा उघडकीस
उरकुडे यांची फसवणूक करण्यासाठी आलेल्या आरोपींनी या कृत्यासाठी जी कार वापरली त्या कारचा क्रमांक सीजी १२ एआर ७१९४ होता. ती कार गोंदियाच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाघाट टी पॉईट,गोंदिया येथे सापळा रचून नाकाबंदी केली. २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता रावणवाडी कडून गोंदियाकडे येणाऱ्या त्या कारला थांबवून तपासणी केली असता त्या चारचाकी कारमध्ये ५ संशयित व्यक्ती दिसले. त्यांची कसून चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली दिली.