लोकमत न्यूज नेटवर्क देवरी : वन परिक्षेत्र कार्यालय दक्षिण देवरीअंतर्गत कोसबी संरक्षित वन क्षेत्र परिसरात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शेतातील झोपडीत ताराचे फासे बाळगणाऱ्या शेतमालक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बारसाय हगरू कटेंगा (५०, रा. कोसबी), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, ही कारवाई सोमवारी (दि.२६) करण्यात आली.
वन विभागाद्वारा प्राप्त माहितीनुसार, वन परिक्षेत्र दक्षिण देवरी अधिनस्थ कर्मचारी व वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे कर्मचारी कोसबी नियत क्षेत्रात वन कक्ष क्रमांक- ६०३ मधील वनालगत असलेल्या शेतात गस्त घालत होते. यादरम्यान कोसबी येथील शेतमालक बारसाय कटेंगा याच्या शेतातील झोपडीत वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी शेतात लावणारे फासे ठेवलेले आढळून आले. यावर पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याच्या विरुद्ध वनाधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६), २ (३५) ९, ५०,५१ नुसार गुन्हा दाखल केला. त्याला मंगळवारी (दि.२७) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र, वन अधिकाऱ्यांनी आरोपीकडून वन्य प्राण्यांच्या शिकारीकरिता उपयोगात येणारे फासे जप्त केले आहे. ही कार्यवाही उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात व सहायक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्प) योगेंद्रसिंग यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी बंडू चिडे, क्षेत्र सहायक एच.एस. गोस्वामी, बी.टी. रहांगडाले, आर. आर. भिवगडे, बी. एस. खुडसाम, के.झेड. बिजेवार, आर. जी. थोरले, कुणाल मुलतानी यांनी केली.