गोंदिया : इलेक्ट्रिक दुकानातून आठ टीव्ही चोरून नेणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. २० ते ३० एप्रिल दरम्यान ही चोरीची घटना घडली होती व चोरट्याला शनिवारी (दि.१५) अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख १५ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील बाजार परिसरात असलेल्या कामाक्षी बारच्या खाली असलेल्या टीव्हीच्या दुकानातून २० जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान ८ एलईडी टीव्ही चोरीला गेले होते. सचिन पांडे (रा. पांडे लेआऊट, अंगूर बगीचा) यांच्या तक्रारीवरून व या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत होती. दरम्यान, शनिवारी (दि.१५) गुन्हे शाखेच्या पथकाने शिवप्रसाद साहेबलाल पिसोडे (३९, रा. स्कूलटोली, हिवरा) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावर त्याने चोरीची कबुली दिली असता त्याच्याकडून सहा नग ४३ इंच एलईडी टीव्ही किंमत ९० हजार रूपये, एक नग ४३ इंची टीव्ही किंमत १५ हजार रूपये व एक ३२ इंची टीव्ही किंमत १० हजार रुपये असा एकूण एक लाख १५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार सोमेंद्र तुरकर, रियाज शेख, सुजित हलमारे, इंद्रजित बिसेन, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, चालक पोलिस शिपाई कुंभलवार यांनी केली आहे.